‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फू बाई फू’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अशा विनोदी कार्यक्रमांमुळे अभिनेता अंशुमन विचारे घराघरांत लोकप्रिय झाला. आपल्या दमदार विनोदशैलीने अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. करोनानंतर वैयक्तिक कारणास्तव अंशुमनने छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला. सध्या तो ‘राजू बन गया झेंटलमन’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
अंशुमन विचारे कामाव्यतिरिक्त इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असतो. त्याचे पत्नीबरोबरचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. संपूर्ण प्रवासात अभिनेत्याला त्याच्या पत्नीची मोलाची साथ लाभली. अंशुमनने नुकतीच आपल्या कुटुंबासह लोकमत फिल्मीच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपल्या पहिल्या घराची आठवण सांगितली.
हेही वाचा : ‘अप्पी आमची कलेक्टर’ आता नवीन वेळेत! ‘झी मराठी’वर होणार मोठा बदल, ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार निरोप
अभिनेता म्हणाला, “पल्लवी (अंशुमनची पत्नी) माझ्या आयुष्यात आल्यावर खूप गोष्टी अचानक बदलल्या. आयुष्यात आपण सगळेच प्रगती करत असतो परंतु, आपल्या प्रत्येकासाठी लक फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो. पल्लवी येण्यापूर्वी माझ्या हातातून अनेक गोष्टी निसटल्या पण, पल्लू आल्यावर सगळंच बदललं. आमचं पहिलं घर आम्ही घेतलं. इतका सुंदर फ्लॅट मी घेईन असं मला आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं. पहिलं घर खरेदी करताना त्या व्यक्तीला ८ दिवसांत २० लाख रुपये द्यायचे होते. पल्लवीने त्या माणसाला आधीच बुकिंगचे ५ हजार दिले होते. त्यावेळी मी तिला म्हटलं तुझे पैसे आता फुकट जाणार, आपण २० लाख रुपये कुठून आणणार? तेव्हा तिने एफडी मोडली होती. “
हेही वाचा : Video : भगरे गुरुजींच्या लेकीची ‘कलर्स मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री! शेअर केली पहिली झलक
अंशुमनची पत्नी पल्लवी याविषयी सांगताना म्हणाली, “मी माझी एफडी मोडून त्याला ५ लाख रुपये दिले आणि उरलेल्या १५ लाखांसाठी तुझ्या मित्रांकडे विचारपूस कर असं मी सुचवलं. कोणाकडून पैसे घेण्यास अंशुमन अजिबात तयार नव्हता. पण, मी त्याला अशा काळात तुझे खरे मित्र कोण आहेत याची कल्पना तुला येईल असं सांगितलं. त्यानंतर त्याने मित्रांना फोन लावले. त्याच्या काही मित्रांनी देखील आम्हाला मदत केली आणि ४ ते ५ दिवसांत आम्ही २० लाख रुपये जमा केले.”
हेही वाचा : ईशा देओल भेटल्यावर ‘अशी’ होती सावत्र आईची प्रतिक्रिया; आजारी काकांसाठी अभिनेत्री गेली होती सनी देओलच्या घरी
“बँकेकडून १५ वर्षांसाठी कर्ज मिळेल असं मला वाटलं होतं. पण, सगळंच उलटं झालं. तुमच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना आम्ही एवढ्या कालावधीसाठी कर्ज देत नाही असं मला बँकेने सांगितलं. शेवटी १० वर्षांसाठी कर्ज मिळालं. तेव्हा तब्बल ४० हजारांचा दर महिना बँकेचा हफ्ता होता. आता सांगायला खूप बरं वाटतंय की, ते कर्ज मी अवघ्या ५ वर्षांमध्ये फेडलं. या सगळ्यात पल्लवीने खूप साथ दिली. याशिवाय आता नुकतंच आम्ही आणखी एक घर खरेदी केलं आहे.” असं अंशुमन विचारेने सांगितलं.