मराठी नाटक, मालिका, सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या बहुरंगी अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी ‘आरपार ऑनलाइन’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यादरम्यान, अविनाश नारकरांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतील अनेक अनुभव सांगितले आणि या सगळ्यात लक्षात राहणारी आठवण होती ती म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीची…याचा खास किस्सा अविनाश नारकरांनी या मुलाखतीत सांगितला आहे.

अविनाश नारकरांनी ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत शहाजीराजे भोसलेंची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका पाहून, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालिकेत शहाजी महाराज कोणी साकारलेत? फार अप्रतिम काम केलंय त्या माणसाने” असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. यानंतर नारकरांनी स्वत: येऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती.

अविनाश नारकर म्हणाले, “आता इतक्या मोठ्या माणसाने माझी आठवण काढली तर मी कोणत्याही परिस्थितीत त्यांना भेटायला जाणार हे स्वाभाविक होतं आणि मी गेलो. मला त्यांनी लांबून असं पाहिलं आणि ते म्हणाले, या या शहाजी महाराज… मी आत गेलो…भेट घेतली आणि माझ्या नाटकातील संवाद म्हणून दाखवला.”

“लढेन मी शस्त्रानेच पण, शस्त्रविवेक न सोडता. मोडेन मी कायदा न्यायाच्या प्रतिष्ठेसाठी…हिंसा घडेल हिंस्त्रहिंसकांच्या नाशासाठी… आम्ही होऊ धर्मवेडे धर्मवेड्यांच्या संहारासाठी… होऊ थोडे असंस्कृत संस्कृतीच्या रक्षणासाठी… जे या मातीत राहतायत त्यांनी या मातीवर प्रेम करायला शिकायला हवं. कारण, ही मातीच तुम्हाला अन्न देते, तुमच्या श्वासांना प्राणवायू देते. आपल्या लेकरांनी चालवलेल्या नागरांच्या फाळांनी ती आपला ऊर चिरून घेते आणि परत देते पेरलेल्या तरेख दाण्यागणिक हजार दाणे…म्हणूनच, तिने न मागता तुम्ही तिला द्यायला हवी निष्ठा. ज्यांना राष्ट्रनिष्ठा मान्य नसेल त्यांनी हे राष्ट्र सोडायला हवं.” हा संवाद नारकरांच्या १९९३ मधल्या नाटकाचा आहे.

अभिनेते पुढे म्हणाले, “मी असं सगळं म्हटल्यावर ( नाटकातील संवाद ) बाळासाहेबांचे डोळे लाल-लाल झाले. ते जोरात म्हणाले अविनाश…अन् त्यांना ढास लागली. त्यानंतर सर्वांची एकच धावपळ सुरू झाली. मला काहीच कळेना…दादा म्हणाले थांब जरा. बाळासाहेब पाणी वगैरे प्यायले आणि म्हणाले, नाही-नाही पंत… अहो १९९३ साली केलेलं नाटक आहे अजून संवाद मुखोद्गत आहेत. तर, मला काही सुचेना.. मी त्यांना म्हणालो, बाळासाहेब हे संवाद नाही हे विचार आहेत. हे वीर सावरकरांचे आणि तुमचे विचार आहेत… आणि तुमचे हे विचार कधीच पुसले जाणार नाहीत.”