‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ रोशन सिंग सोढी हे पात्र साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता गुरुचरण सिंग काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. जवळपास २६ दिवसांनी तो घरी परतला होता. आता त्याची प्रकृती ठिक आहे. गुरुचरणला तो बेपत्ता का झाला होता, याबाबत विचारण्यात आलं, त्यावर त्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असल्याचं म्हटलं आहे. वृद्ध आई- वडिलांना न कळवता घरातून निघून जाण्याबद्दल विचारलं असता गुरुचरण काय म्हणाला, ते जाणून घेऊयात.
गुरुचरण सिंगने म्हटलंय की तो बेपत्ता का झाला होता, त्याबद्दल आता बोलू शकत नाही, कारण त्याआधी त्याला काही कायदेशीर बाबी पूर्ण करणं आवश्यक आहे. “मी त्याबद्दल बोलण्यापूर्वी मला काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. एकदा त्या कायदेशीर गोष्टी पूर्ण झाल्या की मग मी त्याबद्दल नक्कीच बोलेन,” असं गुरूचरण सिंगने ‘टाइम्स नाऊ’ला सांगितलं.
तो पुढे म्हणाला, “माझ्या ज्या काही फॉरमॅलिटी होत्या त्या मी पूर्ण केल्या आहेत. पण आता माझ्या वडिलांना जाऊन काही फॉरमॅलिटी पूर्ण कराव्या लागतील. निवडणुका चालू असल्याने आम्ही त्या संपायची वाट पाहत होतो. आम्हाला न्यायालयीन औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील,” असं गुरुचरण सिंग म्हणाला.
प्रकृती एकदम ठणठणीत असल्याचं गुरुचरणने सांगितलं. २६ दिवस घरात कुणालाच न सांगता, वृद्ध आई-वडिलांना कोणतीही माहिती न देता गायब होण्याबद्दल विचारलं असता गुरुचरण म्हणाला, “मी लवकरच तुमच्याशी याबद्दल बोलेन आणि तुम्हाला सर्व काही सांगेन. कोणत्या गोष्टीमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला, तेही सांगेन, पण त्यापूर्वी मला थोडा वेळ द्या. फॉरमॅलिटी पूर्ण झाल्या की मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन.”
अभिनेता गुरुचरण सिंग २२ एप्रिल रोजी बेपत्ता झाला होता. तो मुंबईला येण्यासाठी घरातून निघाला मात्र विमानतळावर न जाता दुसरीकडेच निघून गेला. तो चार दिवस शोधूनही सापडला नाही, त्यानंतर त्याचे वडील हरगीत सिंग यांनी दिल्लीतील पालम पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दिल्ली पोलीस अभिनेत्याच्या शोध घेण्यासाठी हरयाणा, उत्तराखंडलाही गेले होते. इतकंच नाही तर दिल्ली पोलिसांच्या टीमने मुंबईत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या सेटला भेट दिली आणि चौकशी केली होती. ही सर्व शोध मोहिम सुरू असताना गुरुचरण १८ मे रोजी स्वतःच सुखरूप परतला. धार्मिक यात्रेवर गेल्याचं त्याने परतल्यावर सांगितलं होतं.