लोकसभेत बुधवारी ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यावेळी सगळ्याच खासदारांनी त्यांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांनी त्यांना त्यांच्या जागेपर्यंत नेलं. त्यावेळी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी हस्तांदोलनही केलं. या सगळ्या घडामोडी चर्चेत आहेत. अशातच अरविंद सावंत यांनी जे भाषण केलं त्यावरुन आता अभिनेते किरण मानेंनी एक पोस्ट लिहिली आहे. ज्या पोस्टची चांगलीच चर्चा होते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरविंद सावंत यांनी केलं ओम बिर्लांचं अभिनंदन

अरविंद सावंत यांनी ओम बिर्लांचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांना जो अवधी भाषणासाठी देण्यात आला होता त्यात त्यांनी मणिपूरचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न मांडला आणि याबाबत सरकारने उपाय योजले पाहिजेत असंही म्हटलं. याबाबत आता किरण मानेंनी एक पोस्ट केली आहे. ही माझी खरी शिवसेना असंही किरण माने म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते अरविंद सावंत?

“लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचं मी अभिनंदन करतो. पाच वर्षे आम्ही तुमचा अनुभव घेतला. जुन्या सदनातून आता आपण नव्या सभागृहात आलो आहोत. आज तुम्ही एखाद्या न्यायाधीशासारख्या पदावर विराजमान झाला आहात. मी मनापासून तुमचे आभार मानतो. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की कायदे मंजूर करण्यात आले. त्यात एक कायदा मंजूर करण्यात आला निवडणूक आयोगासंबंधीचा. तो कायदा आमचं निलंबन झाल्यावर पास झाला. न्यायदानाची प्रक्रिया असते, कायदे बनवणारे आपण आहोत. तोच कायदा बदलला की संविधानाचा विषय येतो. संविधानाच्या सुरक्षेसाठीच आम्ही इंडिया आघाडी केली.”

हे पण वाचा- “तुम्ही जात पाहून स्कॉलरशिप आणि नोकऱ्या देता, लायकी..”, शाहू महाराजांबाबत किरण मानेंनी केलेली पोस्ट व्हायरल

सरकारकडून संवेदना दाखवली जात नाही तेव्हा वाईट वाटतं

पुढे अरविंद सावंत म्हणाले, “आम्ही तुमच्याकडून इतकीच अपेक्षा करतो आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा शब्दांमध्ये जान आणि शान दोन्ही असलं पाहिजे. जी वचनं दिली जातात ती पाळली गेली पाहिजेत. संकट काळात सरकारकडून मदत मिळत नाही तेव्हा वाईट वाटतं. आम्ही आता अपेक्षा करतो की स्वातंत्र्य, समानता की आम्हाला सौहार्द हवं, तिरस्कार नको. ज्या भिंती आपण उभ्या करत आहोत त्या भिंती तुटल्या पाहिजे. माणुसकीचं नातं जपलं पाहिजे. मणिपूरसारखी घटना घडते त्याचं कुणाला वाईटही वाटत नाही हे पाहिल्यावर दुर्दैवी वाटतं. शेतकरी आत्महत्या करतात, एवढं मोठं आंदोलन उभं करतात त्यांच्या प्रति साधी दया दाखवली जात नाही तेव्हा वाईट वाटतं. बेरोजगार तरुण फिरत आहेत तरीही हे सदन त्यांना न्याय देऊ शकत नाही तेव्हा वाईट वाटतं. आम्हाला हे वाटतं की सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कामकाज चाललं पाहिजे. सदनाचं कामकाज चाललंच पाहिजे यात दुमत नाही. सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच अपेक्षा आहे. संविधानाचं रक्षण करण्यासाठी आम्ही उभे राहू तेव्हा तुम्ही आशीर्वाद द्याल” असं अरविंद सावंत यांनी म्हटलं होतं.

किरण मानेंची पोस्ट काय?

पहिल्याच दिवशी देशाच्या मूळ दुखण्याला हात घातला… ही माझी ‘आजची’ शिवसेना ! आणि हेच माझ्या शिवसेनेचं हिंदुत्व !! अभिमान आहे मी शिवसैनिक असल्याचा. सलाम अरविंद सावंतजी. ज्या अपयशापासून दूर पळून जाण्यासाठी सत्ताधारी ‘हिंदुत्व’ या शब्दाचा वापर करताहेत, ते अपयश उघडं पाडायला तुम्ही सुरुवात केलीत ! खरं हिंदुत्व माणुसकी शिकवतं, तिरस्कार नाही. खरं हिंदुत्व संवेदनशील असतं, क्रूर नाही. खरं हिंदुत्व प्रेम शिकवतं, द्वेष नाही. माझी शिवसेना खर्‍या हिंदुत्वाच्या आणि संविधान मानणार्‍या देशाच्या रक्षणासाठी कायम उभी ठाकलेली असेल ! अशी पोस्ट किरण मानेंनी केली आहे.

किरण माने हे मागच्या दोन ते तीन दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी नीटच्या गोंधळावर, राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तांदोलनावर, तसंच शाहू महाराजांवरही पोस्ट लिहिली. किरण माने यांच्या या पोस्टचीही सोशल मीडियावर चर्चा होते आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kiran mane post about arvind sawanat and he also criticized narendra modi scj