लोकराजा अशी ओळख असलेले शाहू महाराज यांची जयंती नुकतीच पार पडली. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर करत शाहू महारांजाबाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अभिनेते किरण माने यांनी केलेली पोस्टही चर्चेत आली आहे. एवढंच नाही तर किरण मानेंची पोस्ट व्हायरलही झाली आहे.
काय आहे किरण मानेंची पोस्ट?
“महाराज, जात पाहून स्कॉलरशिप आणि नोकऱ्या देता, हे काही बरे नव्हे. लायकी पाहूनच त्या दिल्या पाहिजेत.” सांगलीचे लै फेमस वकील गणपतराव अभ्यंकर एकदा राजर्षी शाहू महाराजांबरोबर रथातनं चालले होते. बोलता-बोलता त्यांनी महाराजांना सुनावलं.
शाहू महाराज सत्तेवर येण्याआधी नोकरीतल्या सगळ्या वरच्या, महत्त्वाच्या जागा सधन उच्चवर्गीय लोकांनाच दिल्या जायच्या. महाराजांनी मात्र खालच्या-अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांना मोठ्या पदाच्या नोकर्या द्यायला सुरूवात केली होती. त्यावर नाराज होऊन गणपतरावांनी हा आरोप केला होता.
महाराजांनी काय केलं?
महाराज गप्प बसले. काहीही बोलले नाहीत. त्यांनी आपला रथ घोड्यांच्या पागेकडे नेला. नोकराला म्हणाले, “चंदी आण रं.” त्यानं आणलेले हरभरे महाराजांनी एका जाजमावर टाकले. त्याबरोबर हरभरे खायला सगळे घोडे पळत आले. जे दांडगे, तगडे होते, ते लहान, अशक्तांना मागं सारून पुढं घुसले. शिंगरं आन् म्हातारी मागं राहिली. त्यांना खायला चंदी मिळालीच नाही. महाराज म्हणाले, “बघितलंत का अभ्यंकर, जी चलाख, दांडगी आणि ‘लायक’ होती त्यांनीच सगळ्या चंदीचा फडशा पाडला. लहान, रोगी आणि अशक्त उपाशीच राहिली की नाही? म्हणून मी चंदी तोबऱ्यात भरून त्यांना देतो. तसं चारल्याशिवाय ती सशक्त होणारच नाहीत. मग मागासलेल्या अस्पृश्य समाजाला, तुमच्यासारख्यांच्या बरोबरीला आणायला काय करायला पाहिजे? खास सवलती नको का द्यायला???”
हे पण वाचा- मोदी-राहुल गांधींचं लोकसभेत हस्तांदोलन आणि किरण मानेंची पोस्ट; “दुश्मनी जम के करो लेकिन ये गुंजाईश…”
अशा विचारांचा राजांचा राजा, लोकराजा सत्तेवर असताना गोरगरीबांना काय कमी पडणार होतं? आहो, इतिहासात कधी झाली नसंल अशी क्रांती झाली. माझ्या शाहूंच्या राज्यात उच्चवर्गीयांच्या मांडीला मांडी लावून बसून अस्पृश्य – बहुजनांतील मुलंमुली शिक्षण घ्यायला लागली ! फासेपारधी-मातंग-गारूडी समाजातल्या लोकांना राजदरबारी नोकर्या दिल्या गेल्या. त्यांना कामधंदे सुरू करायला शाहूराजांनी खिशातले पैसे दिले ! जातीभेदाची कीड नष्ट करायला आंतरजातीय विवाह लावले गेले. विधवाविवाह-स्त्रियांना शिक्षण, त्यांचे सबलीकरण यावर भर दिला गेला !
कोवळ्या वयाच्या भीमरावातून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं भारतरत्न घडवण्यात शाहू महाराजांचा सिंहाचा वाटा होता ! “शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी करा. ते सामाजिक लोकशाहीचे खरे आधारस्तंभ होते.” असे उद्गार बाबासाहेबांनी काढले, ते उगाच नाही. या देशातला समतेचा पाया भक्कम करणार्या महामानवाला मानाचा मुजरा !
किरण माने
किरण मानेंची पोस्ट व्हायरल
किरण माने यांनी केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. तसंच पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या असून किरण मानेंचे आभार मानले आहेत आणि शाहू महाराजांना अभिवादन केलं आहे.