अभिनेते आणि शिवसेना सदस्य किरण माने यांनी आज आषाढी एकादशीच्या दिवशी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी तुकाराम महाराजांचा उल्लेख केला आहे. तसंच या पोस्टमध्ये त्यांनी तुकाराम महाराज हे विठ्ठलामध्ये गौतम बुद्धाला पाहात होते असंही म्हटलं आहे. किरण मानेंची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
काय आहे किरण मानेंची पोस्ट?
आपला तुकोबाराया विठ्ठलामध्ये गौतम बुद्धाला बघत होता हे “बौद्ध्य अवतार माझीया अदृष्टा” सारख्या अभंगामधून कळतं. गाथेतल्या कित्येक अभंगांत बुद्ध विचार सापडतो. तसंच, काही अभंगांमधून हे ही कळतं की, तुकोबाराया ‘अल्ला आणि इठूराया’ला वेगळं मानत नव्हता ! पण काय गंमत आहे बघा की, विठ्ठल-बुद्ध आणि अल्ला यांना मानणार्यांमध्ये मात्र आपल्याला फूट पडलेली दिसते. भिंतीच उभ्या राहिल्यात माणसामाणसात. का होत असेल असं?
अभंगांचा अर्थ लावणं खायचं काम नाही
मी बर्याचदा तुकोबारायाचे अल्लावरचे अभंग काढून समजून घेत बसतो. उर्दू,फारसी आणि मराठी शब्दांनी सजवलेल्या त्या अभंगाचा अर्थ लावणं, हे खायचं काम नाय भावांनो… पण तो लागला आणि मेंदूत मुरला तर या भेदाभेदाच्या भिंती धडाधडा कोसळतात. तुकोबांनी लिहीलेल्या “आवल्ल नाम अल्ला बडा लेते भूल न जाये” …या अभंगाचा आशय खोलात जाऊन अभ्यासताना मला एक लै इंटरेस्टिंग गोष्ट सापडली !
आणि मुंडा शब्दाचा अर्थ सापडला
त्या अभंगाच्या शेवटी तुकोबाराया म्हणतो “एक तीर नहीं प्यार जीतनकी आस । कहे तुका सो हि मुंडा राखलिये पायेनपास ।।” याचा अर्थ असा की…”पैलतीर गाठणं अर्थात मुक्ती-मोक्ष वगैरे मिळवणं हा माझा उद्देश नाही, तर मला फक्त प्रेम जिंकण्याची आस आहे. त्यामुळे ‘मुंडां’नी मला त्यांच्या पायाशी रहाण्याचा आनंद घेऊ द्यावा.” ‘मुंडा’ म्हणजे काय? तुकोबाराया एवढं आदरानं नांव घेतात म्हणजे काहीतरी वेगळं असणार. हिंदी सिनेमात प्रेयसी प्रियकराला ‘मुंडा’ म्हणताना लै वेळा ऐकलंय आपण. पण या शब्दाचा खरा मूळ अर्थ मला तळाशीकर गुरूजींच्या ग्रंथात सापडला. तिथं लिहीलंय ‘मुंडा’ म्हणजे ‘मुस्लीम संतांचा एक प्रकार’.
हे पण वाचा – किरण मानेंची पोस्ट, “संतांनी टाईमपास म्हणून वारी सुरु केली नव्हती, खतरनाक विद्रोह…”
तुकोबारायांच्या काळात तर मुस्लीम सुफी संतांचा हिंदू-मुस्लिम जनतेवर लै पगडा होता. म्हणजे तुकोबारायांनी त्या ओळीत ‘सुफी संतांच्या पायाशी रहाण्याचा आनंद’ मागितलाय ! सुफींचं अल्लाहला साद घालणं, हे हिंदूंच्या देवाला आळवण्याच्या पद्धतीशी मॅच होणारं आहे. हाच अभंग मी पुन्हा त्या अंगानं वाचल्यावर लक्षात आलं, तुकोबारायाचा हा अभंग म्हणजे एक ‘सुफी’ भक्तीगीतच आहे… जे मुस्लीम संत आणि फकीर गातात !
सुफी संप्रदायही वारकऱ्यांसारखाच आहे
आणखी एक गंमत सांगतो.. ‘सुफी’ हा इस्लाममधला असा संप्रदाय आहे, जो आचारविचारांनी आपल्या ‘वारकरी संप्रदाया’शी मिळताजुळता आहे ! ‘सुफी’ हा सुद्धा वारकर्यांसारखा एकेश्वरवादी संप्रदाय हाय, जो धार्मिक कट्टरतेपासून लांब आहे. कर्मकांड मानत नाही. प्रेम आणि नामस्मरण हीच ईश्वरापर्यन्त पोहोचण्याची खरी वाट आहे, असं या ही संप्रदायाचं मानणं आहे. वारकरी संप्रदायासारखाच ‘सुफी’ संप्रदायही सर्वधर्मसमभाव, मानवता, उदारमतवाद यासाठी प्रसिद्ध आहे.
असंच नातं बौद्ध धम्मातल्या ‘चारिका’ आणि आपली वारकर्यांची ‘दिंडी’ या दोन्हीत सापडतं ! बौद्ध भिक्खू पायी चालत निघतात. ठिकठिकाणी लोक स्वखुशीनं,स्वखर्चानं त्यांच्या जेवणा-राहण्याची सोय करतात. दिंडीतही वारकर्यांना जेवण देणं, त्यांची सेवा करणं हे सन्मानाचं समजलं जातं. थोडाफार फरक असला तरी दोन्हीचं मूळ उद्दिष्ट हे ‘समता-बंधुता’ रूजवणं हेच आहे !
हिंदू-मुस्लीम-बौद्ध एकतेची नाळ किती जुनी आहे बघा भावांनो. असंच आपल्याला इतरही धर्मांबाबतीत सापडतं. बुद्ध, बसवण्णा, महावीर, मोइनुद्दीन चिश्ती, नामदेव, गुरूनानक, कबीर, तुकाराम…अशा सगळ्यांचं एकमेकांशी घट्ट वैचारीक नातं आहे.. पण आज यांचे अनुयायी मात्र एकमेकांना पाण्यात बघतात. म्हणजे, आपणच या महामानवांच्या विचारांना नीट समजून घेण्यात कुठंतरी कमी पडतो.
आज आषाढी एकादशी ! आजच्या दिवशी संतांच्या समतेच्या, मानवतेच्या विचारांची राखण करायचा संकल्प करूया आणि भेदभावाला, उच्चनीचतेला नष्ट करूया…
इठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल
किरण माने
अशी पोस्ट अभिनेते किरण माने यांनी लिहिली आहे. जातीभेदाच्या आणि धर्माच्या भिंती आपल्या आपणच पाडल्या पाहिजेत. संत साहित्याचं वाचन यासाठी महत्त्वाचं आहे असं किरण माने या पोस्टमधून सुचवू पाहात आहेत. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.