लोकसभेत खासदारांचे शपथविधी सुरु आहेत. यावेळी सोमवारी सर्वात पहिली शपथ नरेंद्र मोदींनी घेतली. त्यावेळी राहुल गांधींनी मोदींना संविधान दाखवलं. सोशल मीडियावर या व्हिडीओची चांगलीच चर्चा होते आहे. आता अभिनेते किरण मानेंनी यावरुन एक पोस्ट लिहित मोदींना टोला लगावला आहे. तसंच सत्ता मिळाली तरीही उतू नका मातू नका असाही सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे किरण मानेंची पोस्ट?

काल संसदेत मोदी शपथ घ्यायला उभे राहीले. राहुल गांधींनी त्यांना हात उंचावून ‘संविधान’ दाखवले. मोदींनी पडलेल्या चेहर्‍याने डोळे तिरके करुन तिकडे पाहिले. राहुल गांधींनी आपल्या शेजारी अयोध्येच्या खासदाराला बसवलेलं होतं. हे भारतीय लोकशाहीतलं अतिशय सुंदर दृश्य होतं.

या लोकसभा निवडणुकीनं संपूर्ण देशातल्या सर्वसामान्य जनतेला काहीतरी भन्नाट-जबराट ‘फीलींग’ दिलंय. सत्ताबदल झाला नाही, तरीही विरोधकांमध्ये जल्लोष आणि आनंदाचं वातावरण आहे. सत्ताधारी जिंकूनही हरलेल्या चेहर्‍याने फिरत आहेत.

एनडीएतल्या मित्रपक्षांना भाजपाने फक्त स्वार्थासाठी जवळ केलं होतं

भाजपाचा फक्त स्वत:वर फोकस होता. एनडीएचे सहकारी पक्ष निव्वळ स्वार्थासाठी जवळ केले होते. ‘युज ॲन्ड थ्रो’. त्यांना दोनशे बहात्तर पेक्षा एक जरी सीट जास्त मिळाली असती तर मोदींचा तोरा काही वेगळाच असता. भक्तांचा थयथयाट, उन्माद, उच्छाद यांनी अख्खा देश नासवला असता. निवडणुकीपुर्वी सोशल मिडीयावर “चार जून नंतर दाखवतो तुला.” या कॉमेन्टनं धिंगाणा घातलावता तो त्यामुळेच ! इलेक्शन कमिशनपास्नं इव्हीएम पर्यन्त सगळे आपल्या ताब्यात आहेत. ‘जय श्रीराम’च्या घोषणेची भूल जनतेला दिलीय आपण. जनता बधिर झाली आहे, ही खात्री होती त्यांना.

रामानेच भाजपाला लाथाडलं

पण दोनशे चाळीस गाठता-गाठता धाप लागली भाजपाला. त्यातल्या शंभरेक ठिकाणी हजार-दोनहजाराचा निसटता विजय. त्यात अयोध्येसह जिथे-जिथे प्रभू श्रीरामांचे अस्तित्व होते त्या सगळ्या ठिकाणी रामानेच त्यांना लाथाडले ! महामहीमचा चेहरा काळवंडला. सोशल मिडीयावरचे भक्त कोमात गेले. संविधान सुरक्षित राहीले. लोकशाही जिंकली.

खोटी हवा भरुन फुगवलेला फुगा फुटला

परवा वाराणसीमध्ये कुणीतरी मोदींच्या गाडीवर चप्पल फेकुन मारली. राहुल गांधी यावर खुप छान बोलले, “नरेंद्र मोदींचा जो ‘कॉन्सेप्ट’ होता तोच विरोधकांनी उद्धवस्त केलाय.” हा कॉन्सेप्ट होता, ‘हजारो करोड खर्चून केलेले न्यूज चॅनल्सवरचे मार्केटिंग आणि ईडी वगैरेची भिती’ ! या निकालानं जनतेतून आणि नेत्यांमधून मोदींची ‘भिती’ निघून गेली आणि त्याची जागा हसं होण्यानं घेतली. आजकाल सर्वसामान्य जनतेपासून युट्यूबर्स पर्यंत सगळे मोदींना ‘रिडीक्यूल’ करतात. परवा गाडीवर चप्पल फेकणे हा त्याचाच परिपाक होता. थोडक्यात खोटी हवा भरुन फुगवलेला फुगा फुटला.

…म्हणून भावांनो, सत्ता मिळाली तरी उतू नका. मातू नका. ‘चढता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जायेगा’, हे लक्षात ठेवा…
“कल जो तनके चलते थे, अपनी शान-ओ-शौकत पर…
शमा तक नही जलती, आज उनकी तुरबत पर !”

ज्यांनी नम्रपणे लोकशाही जपली, कष्टकरी रयत जपली त्यांनाच लोक शेकडो वर्षांनंतरही काळजात जपतात. माझ्या शिवरायाची आणि माझ्या भीमरायाची बरोबरी करणं हे खायचं काम नाही ! यासाठी मापात रहा बेट्याहो, ही भारतभुमी आहे.

जय शिवराय… जय भीम.

किरण माने

अशी पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे. त्याआधी त्यांनी नीट परीक्षेतील गोंधळावर आणि राम मंदिराच्या गळणाऱ्या छतावरही पोस्ट लिहिली होती. त्यावरुन किरण माने आक्रमक झाले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा मोदींना टोला लगावत पोस्ट लिहिली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kiran mane taunts narendra modi and bjp about his oath as mp what did he say scj