लोकसभा निवडणुकीचा निकाल हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे इंडिया आघाडीने मिळवलेल्या २३०+जागा. देशभरात इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. निकालानंतर एनडीएच्या पाठिंब्यावर मोदी पंतप्रधानही झाले आहेत. तर लोकसभेचं अधिवेशनही सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ओम बिर्ला यांची लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी या दोघांनीही ओम बिर्लांचं अभिनंदन केलं. त्यानंतर या दोघांनाही त्यांच्या जागेवर बसवण्यात आलं. त्या दरम्यान राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी हस्तांदोलन केलं. याचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यावरुन अभिनेते किरण मानेंनी केलेली पोस्टही चर्चेत आहे.
लोकसभेत मोदी आणि राहुल गांधी समोरासमोर
राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यावर ओम बिर्ला यांचं अभिनंदन केले. त्यांना त्यांच्या आसन व्यवस्थेपर्यंत नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि संसदीय कार्यमंत्री रिजिजू गेले होते. यावेळी राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन केले. दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणूक काळात एकमेकांवर तुफान हल्लाबोल केला होता. राहुल गांधींचा उल्लेख मोदींना ‘शहजादा’ असा केला होता. तर पंतप्रधान मोदी हे तिरस्कार पसरवत आहेत, आमची लढाई विचारधारांची आहे असं राहुल गांधी म्हणाले होते. याशिवाय इतर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही रंगलं होतं. आता याच वरुन किरण मानेंनी एक पोस्ट केली आहे.
काय आहे किरण मानेंची पोस्ट?
अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. आज त्यांनी केलेली पोस्टही खास आहे. किरण मानेंनी मोदी आणि राहुल गांधींच्या हस्तांदोलनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणतात, “..आणि एक दिवस त्याच राहुलने नजर भिडवल्यावर, ‘ते’ नजरेला नजर देऊ शकले नाहीत ! इसलिए, दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे…जब कभी हम सामने आ जाएं, तो शर्मिंदा न हों !”
हे पण वाचा- किरण मानेंचा टोला, “राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना संविधान दाखवलं, पडलेल्या चेहऱ्याने डोळे..”
विरोधकांचा आवाज दाबू नका, राहुल गांधीचा टोला
राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते म्हणून निवडले गेले आहेत. आज त्यांनी ओम बिर्ला यांचं अभिनंदन करताना एनडीए सरकारविरोधात टोलेबाजीही केली. तुमच्याकडे संख्याबळ आहे, पण त्या आधारावर विरोधकांचा आवाज दाबून टाकू नका, आम्हालाही आमचे मुद्दे मांडण्याची संधी द्या. असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात मोदी आणि राहुल गांधी असा थेट सामना लोकसभेत पाहण्यास मिळू शकतो. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी या दोघांमध्ये चांगल्याच रंगल्या होत्या. आता आज दोन्ही नेते समोरासमोर आले. त्यांनी हसत हसत हस्तांदोलनही केलं. मात्र त्याच प्रसंगावर किरण मानेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.