शिवसेना नेते आणि अभिनेते किरण माने हे त्यांच्या आक्रमक पोस्टसाठी चर्चेत असतात. किरण माने यांनी आता पुन्हा एकदा सेना न्हावी यांच्याविषयी लिहित ब्राह्मण्यवादावर भाष्य केलं आहे. सेना महाराजांनी मांडलेत तब्बल आठशे वर्षांपूर्वी उपासतापास करु नका असं सांगितलं आहे असंही किरण मानेंनी म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी संतांनी टाइमपास म्हणून वारी सुरु केली नव्हती असं म्हटलं होतं. आता त्यांची नवी पोस्ट चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वारी म्हणजे खतरनाक विद्रोह होता, किरण मानेंची १० जुलैची पोस्ट

“वारी ही लै लै लै नादखुळा गोष्ट आहे. खणत गेलं तर मानवतेचा खजिना सापडतो. आपल्या संतांनी असंच ‘टाईमपास’ म्हणून वारी आणि किर्तनपरंपरा सुरू केली नाही. माणसामाणसातले सगळे भेदभाव नष्ट करणारा खतरनाक विद्रोह होता तो. याचं जगात भारी उदाहरण म्हणजे पैठणचा हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा ! संत एकनाथांच्या पालखीसाठी जाणाऱ्या किंवा नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या याच दर्ग्यात मुक्कामाला थांबतात. तिथले मुस्लिम बांधव सगळ्या वारकऱ्यांची खूप प्रेमानं, उत्साहानं सेवा करतात. या मुक्कामात आपले वारकरी दर्ग्याला भक्तीभावानं पूजतात. मुस्लिम बांधवांकडून आपल्या वारकर्‍यांना जेवण दिलं जातं.

हे पण वाचा- किरण मानेंची पोस्ट, “संतांनी टाईमपास म्हणून वारी सुरु केली नव्हती, खतरनाक विद्रोह…”

किरण मानेंची आजची पोस्ट काय?

जातपात, उच्चनीच सगळं पुसून माणसाला माणूस बनवायची धडपड म्हणजे ‘वारी’ ! आपल्या संतांनी भेदाभेद, वर्चस्ववादाविरोधात केलेला खतरनाक विद्रोह म्हणजे ‘वारकरी संप्रदाय.’ अशा विद्रोही संतांच्या मांदियाळीतला सुरूवातीच्या काळातला निडर हिरो होता – ‘सेना न्हावी’ ! संत नामदेवांनी हे अनमोल रत्न मध्यप्रदेशातल्या बांधवगड संस्थानातनं शोधून काढलं. संत सेना यांनी आपल्या परखड, रोखठोक शब्दांनी ब्राह्मण्यवादी व्यवस्थेला मुळापासून हादरे दिले. त्यावेळी उच्छाद मांडलेल्या विषारी वैदिक पिलावळीला त्यांनी आल्याआल्या इशारा दिला असं म्हणत सेना न्हावी यांचा अभंग किरण मानेंनी पोस्ट केला आहे.

काय आहे तो अभंग?

“आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।”

अभिनेते किरण माने यांची पोस्ट आहे तरी काय? जाणून घ्या त्यांनी काय म्हटलं आहे त्यांच्या पोस्टमध्ये.

पुढे काय म्हणाले किरण माने?

धर्माचे थोतांड मांडून स्वत:चे पोट भरणारी बांडगुळं त्यांना ट्रोल करू लागली. पण सेना महाराज मागं हटले नाहीत. आपल्या धारदार शब्दांच्या वस्तार्‍यानं त्या ट्रोलर्सची लै बेक्कार भादरायला सुरूवात केली
“धर्माचे थोतांड । करुनि भरी पोट । भार्या मुले मठ । मजा करी ।।
पुराण सांगता । नागावानी डोले । अविर्भाव फोल । करीतसे ।।
गळा माळा भस्म । नेसे पितांबर । साधुचा आचार । दाखवितो ।।
सेना म्हणे ऐशा । दांभिका भजती । दोघेही जाताती । अधोगती ।।”
असे दणके देत पार चंपीच करुन टाकली त्यांची.

ब्राह्मण्यवादी व्यवस्थेनं बहुजनांना ‘पाप पुण्या’ची भिती दाखवून या कर्मकांड, दैववादात अडकवलं होतं. ते उडवून लावत सेना महाराज बहुजनांना सांगायचे, पुण्य मिळवण्यासाठी यज्ञयाग, अभिषेक करून ब्राह्मणाला दक्षिणा देण्याची अजिबात गरज नाही… माणुसकीच्या नात्यानं परोपकार करा, पुण्य मिळेल… “करीता परोपकार । त्याच्या पुण्या नाही पार ।। करिता परपीडा । त्याच्या पायी नाही जोडा ।।”

‘धर्मोपदेश’ करून अडाणी कष्टकरी जनतेला भुलवणार्‍या पाखंडी बुवाबापूंचे बुरखे फाडताना ते म्हणतात,
“धर्म उपदेशी मागेल जो अर्धी । तयाचिया प्रीती भजू नये ।।
थाटमाट करुनि लुबाडीत रांडा । ऐसिया पाखंडा भुलू नये ।।”

आठशे वर्षांपूर्वी सेना महाराजांनी मांडले विचार

एक लक्षात घ्या, हे विचार सेना महाराजांनी मांडलेत तब्बल आठशे वर्षांपुर्वी ! त्याकाळात बहुजनांना, “उपास तापास नका करू व्रत । राहा धरुनी चित्त हरी पायी ।।” असा साधासोपा धर्म शिकवणं म्हणजे खायचं काम नव्हतं राजेहो. विशेष म्हणजे शिखांचा पवित्र धर्मग्रंथ, ‘गुरुग्रंथसाहिब’मध्ये संत सेनांच्या एका अभंगाचा समावेश आहे.

“जेथें वेदा न कळे पार । पुराणासी अगोचर ।।
तो हा पंढरीराणा । बहु आवडतो मना ।।
सहा शास्त्र शिणलीं । मन मौनचि राहिली ।।
सेना म्हणे मायबाप । उभा कटी ठेउनी हात ।।”
कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप तुमच्या चार वेद, अठरा पुराणं, सहा शास्त्रांपेक्षा लै मोठ्ठा हाय हे ठणकावून सांगणार्‍या सेना महाराजांना त्रिवार वंदन.

इठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल…

किरण माने

अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे. या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स मोठ्या प्रमाणावर येत आहेत.नीट परीक्षेच्या गोंधळावरुन आणि लोकसभेत राहुल गांधींनी जे भाषण केलं त्यावरुनही त्यांनी पोस्ट केल्या होत्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. आता त्यांनी कर्मकांड आणि ब्राह्मण्यवादावर भाष्य करणारी पोस्ट लिहिली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kiran mane wrote post about sant sena nhavi and said this thing about brahmins scj