Actor Lalit Manchanda Death : अभिनयविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता ललित मनचंदाने आत्महत्या केली आहे. अभिनेत्याने राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवलं आहे. ललितच्या आत्महत्येच्या बातमीने खळबळ उडाली आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे ललित मनचंदाने धक्कादायक पाऊल उचललं आहे. ललितने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ललितचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्ट मॉर्टमसाठी पाठवला. प्राथमिक तपासात पोलिसांना ललितच्या निधनाबाबत काहीही संशयास्पद आढळलेलं नाही.
ललित मनचंदाने अनेक बॉलीवूड चित्रपट आणि मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या होत्या. यामध्ये ‘क्राइम पेट्रोल’ और ‘इंडिया मोस्ट वांटेड’ या मालिकांचाही समावेश आहे. ललितने नुकतंच एका वेब सीरिजमध्ये काम केलं होतं. या सीरिजबद्दल तो खूप उत्साहित होता. पण तो मागील काही दिवसांपासून मानसिक तणाव व वैयक्तिक समस्यांनी त्रासात होता. त्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
ललितच्या आत्महत्येमागील कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी ललितच्या कुटुंबीय आणि मित्रांची चौकशी सुरू केली आहे. त्याच्या घरातून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही, त्यामुळे त्याच्या आत्महत्येचं कारण नेमकं काय, ते जाणून घेण्यासाठी पोलीस आणखी तपास करणार आहे. ललित खूप शांत आणि सर्वांबरोबर मिळून मिसळून राहणारा होता, असं त्याच्या शेजाऱ्यांचं म्हणणं आहे.
ललित कुटुंबासह मुंबईहून मेरठला राहायला गेला होता. तो मागील ६ महिन्यांपासून मेरठमध्ये आपल्या भावासोबत राहत होता आणि ललित मनचंदाची मुलगा आणि मुलगीही त्यांच्यासोबत राहत होते. न्यूज २४ ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री उशिरा ललित त्याच्या खोलीत झोपायला गेला होता. सोमवारी सकाळी तो बाहेर न आल्याने कुटुंबीय त्याच्या खोलीत गेले. तिथे ललितचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता.
ललितचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर कुटुंबियांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सोमवारी संध्याकाळी अभिनेता ललित मनचंदावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ललितने आर्थिक अडचणीतून हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय.