‘आई कुठे काय करते’फेम अभिनेते मिलिंद गवळी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या आयुष्यातील पडद्यावरील आणि पडद्यामागीलही अनेक गोष्टी ते चाहत्यांबरोबर शेअर करतात. नुकतीच त्यांनी मुंबईतील १०३ वर्षांपूर्वी बांधलेल्या एका प्रसिद्ध वास्तूला भेट दिली आहे. याचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी त्यांचा अनुभवही लिहिला आहे.
मिलिंद गवळी दोन दिवसांपूर्वी काळा घोडा फेस्टिवलला गेले होते. पत्नी दीपा गवळी यांच्याबरोबर त्यांनी काळा घोडा फेस्टिवलला भेट दिल्यानंतर त्यांनी मुंबईतल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ येथेही भेट दिली. यावेळी आलेला अनुभव त्यांनी पोस्टमध्ये लिहिला आहे. इंग्रजांनी बांधलेल्या अनेक वास्तूंची नावे त्यांनी सांगितली आहेत. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय – मुंबई, पूर्वी याचं नाव होतं ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’ १०३ वर्षांपूर्वी हे म्युझियम बांधलं गेलं होतं. इंग्रजांनी बांधलेल्या या म्युझियमचं उद्घाटन १० जानेवारी १९२२ रोजी झालं होतं. इंग्रजांनी पुढे गेटवे ऑफ इंडिया बांधलं, मुंबई उच्च न्यायालय बांधलं, दिल्लीला इंडिया गेट बांधलं, राष्ट्रपती भवनही त्यांनी बांधलं, बृहन्मुंबई महानगरपालिका इमारत, क्रॉफर्ड मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विद्यापीठाची इमारत, त्या वेळचं इतकं सुंदर आर्किटेक्चर आणि आजही भक्कम बांधकाम.”
“परवा काळा घोडा फेस्टिवलला गेलो आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ येथेही गेलो. या वास्तू बघून फारच भारी वाटतं. या ब्रिटिशांच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधलेत, आजही किल्ल्यांवर गेलं की, खूपच भारी वाटतं. इतिहास डोळ्यांसमोर येतो, त्या काळात इतकं भव्य दिव्य बांधकाम कसं केलं असेल याची कल्पनासुद्धा करता येत नाही”, असं मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे.
“या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’मध्ये पुरातन काळातल्या ५० हजारांहून अधिक वस्तू आहेत. त्यातला एक भाग आहे. पूर्वीच्या चलनातल्या नाण्यांचा. त्यामध्ये मी शिवाजी महाराजांच्या काळातील ‘होन’, नाणी पाहिली, सुवर्णमुद्रा बघायला मिळाली. मी महाराजांच्या काळातील या सुवर्णमुद्रा पहिल्यांदाच पाहिल्या. याआधी मी या संग्रहालयात गेलो होतो; पण त्यावेळी ‘होन’ पाहिल्याचं माझ्या स्मरणात नाही. पण पूर्वच्या मोहेंजोदारो, मोगल, ब्रिटिश, छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी पाहून मला फारच भारी वाटलं, त्या काळचे दागिने, गौतम बुद्धांच्या मूर्ती, देव-देवतांच्या मूर्ती, पुरातन काळातले चित्र, त्यांचे वस्त्र, काही वस्तू तर रतन टाटा यांनी या संग्रहालयाला गिफ्ट दिलेली आहेत; त्यापण इथे बघायला मिळाल्या. दर वेळेला हे वस्तुसंग्रहालय बघायला येतो आणि वेगळाच अनुभव मिळतो. या वस्तुसंग्रहालयातल्या वस्तू तुम्हाला वेगळ्या विश्वात घेऊन जातात”, असं मिलिंद गवळींनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
या गोष्टीची वाटली खंत
पुढे मिलिंद गवळींनी मनातील एक खंतही व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिलं, “यावेळी माझ्याबरोबर दीपा होती, ती पहिल्यांदा हे वस्तुसंग्रहालय बघत होती. तीपण खूपच भारावून गेली, आम्ही शाळेतल्या मुलांसारख्या पूर्वीच्या जुन्या जुन्या वस्तू पाहत होतो. पण, हे सगळं पाहून एका गोष्टीची खूप खंत वाटत होती की, या ब्रिटिशांनी आपल्या देशातल्या किती सुंदर आणि मौल्यवान वस्तू लुटून नेल्या आहेत. आपल्या कोहिनूर हिऱ्याचा रेप्लीका डमी येथे ठेवलेला आहे. ते बघून तर आणखी त्रास झाला. आपला हिंदुस्तान किती समृद्ध होता याचीही जाणीव झाली. ज्यांनी कोणी हे पाहिलं नसेल, त्यांनी जरूर बघावं. शाळेतल्या मुलांनी नक्की बघावं.”
मिलिंद गवळींनी मराठी मनोरंजन विश्वात अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘हे दैव जाणीले कोणी’, ‘अथांग’, ‘गहिरे प्रेम’, ‘मुंबई पोलीस’, ‘तू अशी जवळी राहा’, ‘सारे तिच्याचसाठी’ अशा अनेक मालिकांत त्यांचा अभिनय पाहायला मिळाला आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील त्यांची ‘आई कुठे काय करते’ ही मालिका तुफान गाजली. या मालिकेने त्यांना आणखी मोठी आणि वेगळी ओळख मिळवून दिली.