Namish Taneja Father Died of Heart Attack: टीव्ही अभिनेता नमिश तनेजा सध्या ‘मिश्री’ मालिकेत राघव नावाची भूमिका साकारतोय. नमिशवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या वडिलांचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं. शूटिंगवर असतानाच नमिशला त्याचे वडील अभिनेते विक्रम तनेजा यांच्या निधनाची माहिती समजली.

नमिशचे वडील विक्रम तनेजा यांचे शनिवारी (१२ ऑक्टोबर रोजी) दिल्लीत राम लीला सादर करताना निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मुंबईत ‘मिश्री’ या मालिकेचं शूटिंग सोडून नमिश लगेच दिल्लीला गेला. नमिशने वडिलांच्या निधनाबाबत इ-टाइम्सला सांगितलं. “मला अजूनही विश्वास बसत नाही की हे खरंच घडलंय. मी माझ्या वडिलांना नाही, तर माझ्या हृदयाचा तुकडा गमावला आहे. ते माझे सर्वात जवळचे मित्र होते, माझे मार्गरदर्शक होते, मला हरवल्यासारखं वाटतंय,” असं नमिश म्हणाला.

दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आल्यावर झालं निधन

वडिलांच्या अचानक जाण्याने नमिशला धक्का बसला आहे. “माझे वडील राम लीलामध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेले होते. ते अनेकदा कुंभकरण किंवा दशरथचे पात्र करायचे. स्टेजवर सादरीकरण सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असतानाच त्यांना पुन्हा एक हृदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाही,” असं नमिशने सांगितलं.

नमिशने सांगितल्या बालपणीच्या आठवणी

नमिशने वडिलांच्या निधनानंतर त्याच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. “मी शाळेत असताना माझ्या वडिलांना समजलं की मला नृत्याची आवड आहे. नंतर त्यांनी एक रूम रिनोव्हेट केली आणि तिथे मला डान्स करता येईल अशी व्यवस्था केली. त्यांनी नेहमी माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या स्वप्नांना पाठिंबा दिला. जेव्हा जेव्हा मी खचायचो तेव्हा ते मला सांभाळून घ्यायचे. ते माझा आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने माझं जग उध्वस्त झालंय, मात्र मला माझ्या आईसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मजबूत राहावं लागणार आहे, त्यांच्याशिवायचा आमचा पुढचा प्रवास खूप कठीण असेल,” अशा भावना नमिशने व्यक्त केल्या.

३० वर्षांच्या नमिश तनेजाने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलंय. ‘स्वरागिनी’, ‘विद्या’, ‘मैत्री’, ‘मैं मायके चली जाऊंगी’, ‘ऐ मेरे हमसफर’, ‘इक्यावन’, ‘एक नयी पेहचान’, ‘प्यार तुने क्या किया’, ‘ससुराल सिमर का’ या मालिकांमध्ये नमिशने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.