‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील कलाकार त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. या मालिकेत अरुंधतीच्या मोठ्या मुलाची भूमिका साकारत असलेला अभिनेता निरंजन कुलकर्णी याने काही दिवसांपूर्वीच स्वतःचा कॅफे सुरू केला. आता त्या कॅफेमध्ये ‘आई कुठे काय करते’मधील कलाकार येऊन गेले का आणि कॅफेतील पदार्थ खाल्ल्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती, याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे.
काही दिवसांपूर्वीच निरंजनने कॅफेमधील त्याचा एक व्हिडीओ शेअर करत चाहताना त्याने हा नवीन व्यवसाय सुरू केल्याची माहिती दिली. त्याच्या कॅफेला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या कॅफेच्या उद्घाटनाच्या वेळी त्याने कोणत्याही कलाकाराला आमंत्रण दिलं नव्हतं. पण तरीही आतापर्यंत त्याच्या काही जवळच्या कलाकार मित्रमंडळींनी आवर्जून या कॅफेला भेट दिली आहे. यामध्ये ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकारांचाही समावेश आहे.
याबद्दल बोलताना निरंजन म्हणाला, “आम्हाला या कॅफेचे उद्घाटन आमच्या पालकांच्या हस्ते करायचं होतं त्यामुळे मी कोणत्याही कलाकाराला उद्घाटनासाठी बोलावलं नाही. आधी मला असं वाटलं होतं की फक्त माझ्याच मालिकेतील कलाकार माझ्या कॅफेमध्ये येतील. पण फक्त आमच्या मालिकेतीलच नाही तर इतर मालिकांतीलही अनेक कलाकार आतापर्यंत माझ्या कॅफेला येऊन गेले आहेत. आमच्या मालिकेतील यश आणि ईशा येऊन गेले. संजना तिच्या आईबरोबर आली होती. इतकंच नाही तर जाताना ती पावभाजी पार्सलही घेऊन गेली. तिने माझ्या कॅफेला खूप चांगला प्रतिसाद दिला. ईशालाही माझा कॅफे खूप आवडला. या कॅफेच्या निमित्ताने मला कळलं की आपल्या जवळची माणसं कोण आहेत.”
दरम्यान, निरंजनचा हा कॅफे ठाण्यातील घोडबंदर परिसरात आहे. या त्याच्या कॅफेचं नाव ‘बडिज सॅंडविच’ असं आहे. त्याच्या या नवीन व्यवसायाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.