‘सीआयडी २’ मालिका सध्या खूप चर्चेत आहे. या चर्चेचं कारण आहे एसपी प्रद्युमन म्हणजे ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम. अचानक ‘सीआयडी २’मध्ये एसपी प्रद्युमनचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. त्यामुळे शिवाजी साटम यांची मालिकेतून एक्झिट झाली आहे. पण, दुसऱ्याबाजूला शिवाजी साटम सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. त्यांची मालिकेतून एक्झिट होणार असल्याची कोणतीही कल्पना नसल्याचं शिवाजी साटम यांनी सांगितलं. आता ‘सीआयडी २’मध्ये शिवाजी साटम यांची जागा अभिनेता पार्थ समथान घेणार आहे. यानिमित्ताने पार्थ पाच वर्षांनी हिंदी मालिकाविश्वात पुनरागमन करत आहे. याबाबत त्याने काही दिवसांपूर्वी स्वतः खुलासा केला.
१९९८ साली सुरू झालेली ‘सीआयडी’ मालिका तुफान गाजली. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आजही बऱ्याच प्रेक्षकांना ‘सीआयडी’ मालिकेचं वेड आहे. मालिकेचे जुने भाग प्रेक्षक आवडीने बघत असतात. सध्या ‘सीआयडी २’ मालिका जोरदार सुरू असून लवकरच यामध्ये एसपी प्रद्युमनच्या जागी एसीपी आयुष्मानची एन्ट्री होणार आहे. अभिनेता पार्थ समथान एसीपी आयुष्मानच्या भूमिकेत झळकणार आहे. पण, सुरुवातीला पार्थने ‘सीआयडी २’ मधील एसीपी आयुष्मानसाठी नकार दिला होता. याबाबत त्याने स्वतः सांगितलं.
‘हिंदुस्तान टाइम्स’शी संवाद साधताना पार्थ समथान म्हणाला, “सुरुवातीला मी एसीपीची भूमिका साकारण्यास नकार दिला होता. कारण मी त्या भूमिकेशी संबंध जळवू शकत नव्हतो. पण, निर्मात्यांनी मला पुन्हा विचारलं. तेव्हा मला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. कारण मालिकेत मोठ्या कलाकारांची फळी आहे आणि जुनी आहे. एवढंच नाहीतर मला पडद्यावर सर म्हणावे लागले. जे मला थोडं विचित्र वाटतं होतं.”
दरम्यान, पार्थला एसीपी आयुष्मानच्या भूमिकेवरून ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यावर पार्थ म्हणाला की, मी सध्या फक्त सकारात्मक प्रतिक्रियावर लक्ष देत आहे आणि आजूबाजूच्या लोकांमधील उत्सुकता पाहत आहे. कारण मी बऱ्याच काळापासून योग्य संधीची वाट पाहत होतो. यादरम्यान मला अनेक ऑफर्स आल्या. पण त्या सगळ्या रोमँटिक भूमिका होत्या. जेव्हा मला या मालिकेसाठी विचारणा झाली तेव्हा मी हे एक आव्हान म्हणून स्वीकारलं. ‘सीआयडी २’ मालिकेची टीम खूप सहकार्य करणारी आहे. जर काही झालं तर मी निर्मात्यांशी चर्चा करू शकतो.
पार्थ समथानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर. त्याने ‘बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. या मालिकेत तो पृथ्वी सान्यालच्या भूमिकेत दिसला होता. पण ‘कैसी ये यारियां’मधील माणिक मल्होत्राच्या भूमिकेमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याला नवीन ओळख मिळाली. यामध्ये त्याच्याबरोबर नीति टेलर दिसली होती. या मालिकेचे पाच सीझन प्रदर्शित झाले आहेत. यानंतर, पार्थ एकता कपूरच्या ‘कसोटी जिंदगी की २’ मध्ये अनुराग बसूच्या भूमिकेत दिसला. मग २०२४ मध्ये ‘घुडाचढी’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यात संजय दत्त, खुशाली कुमार, रवीना टंडन आणि अरुणा इराणी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.