‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेचा दिवसेंदिवस प्रेक्षक वर्ग वाढत आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका आवडीने पाहत असतात. या मालिकेच्या सेटवर नुकतीच शाळकरी मुलं पोहोचली होती. यावेळी त्यांनी एजेला घेरलेलं पाहायला मिळालं.
अभिनेता राकेश बापट एजे म्हणजेच अभिराम जहागीरदारच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या माध्यमातूनच राकेशने मराठी मालिकाविश्वात पाऊल ठेवलं. नजरेत धार, शिस्तबद्ध आणि रुबाबदार अशी एजेची भूमिका राकेश उत्कृष्टरित्या निभावली आहे. त्यामुळे एजेचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. नुकतंच ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या सेटवर शाळकरी मुलांची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी एजेला पाहण्यासाठी या लहान मुलांनी एकच गोंधळ घातला. याचा व्हिडीओ राकेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
“All hearts…’नवरी मिळे हिटलरला’ सेट…”, असं कॅप्शन लिहित राकेश बापटने शाळकरी मुलांचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राकेशला पाहताच शाळकरी मुलं जोरजोरात ओरडताना पाहायला मिळत आहेत. कोणी राकेशला हात मिळवताना, तर कोणी फोटो काढताना दिसत आहे. हे प्रेम पाहून राकेश भारावला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. तसंच या व्हिडीओवर राकेश चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, राकेश बापटच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘तू आशिकी’, ‘बात हमारी पक्की है’, ‘कुबूल है’, ‘नच बलिए ६’ या शोमध्ये झळकला होता. तसंच ‘वो तुम बिन’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘कुछ दिल ने कहा’, ‘कोई मेरे दिल में है’ यांसारख्या चित्रपटात त्यानं काम केलं आहे. शिवाय राकेश मराठी चित्रपटातही दिसला होता. त्यानंतर आता राकेश ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.