‘झी मराठी’ वाहिनीवर १२ फेब्रुवारीपासून मनसोक्त हसणारी ‘पारु’ प्रेक्षकांच्या भेटीस आली. अभिनेत्री शरयू सोनावणे, प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक, पूर्वा शिंदे, परी तेलंग, अनुज साळुंखे, प्राजक्ता वाडये, विजय पटवर्धन अशी तगड्या कलाकारांनी फौज असलेली ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. याच मालिकेतील एका अभिनेत्याची एक्झिट झाली आहे. यासंदर्भात त्याने स्वतः पोस्ट करून चाहत्यांना सांगितलं आहे.
‘पारु’ या मालिकेत काही दिवसांपूर्वी अभिनेता सचिन देशपांडेची एन्ट्री झाली होती. त्याने अजय हे पात्र साकारलं होतं. अजय हा पारुबरोबर लग्न करण्यासाठी आला होता. यावेळी अजयने पारुला खूप त्रास दिला. पण आता मालिकेतील अजयचा प्रवास संपला आहे. त्यामुळे अभिनेता सचिन देशपांडेची मालिकेतून एक्झिट झाली आहे.
सचिनने नुकतीच सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. पारुबरोबरचे फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे, “गेला दीड आठवडा ह्या गोड मुलीला मी ऑनस्क्रीन फार त्रास दिला. पण आम्ही ऑफस्क्रीन खूप छान मित्र झालो. तसं काम फार दिवसांच नव्हतं. पण जे काही उपद्व्याप करायचे होते. त्यासाठी शरयूने कम्फर्टेबल असणं फार गरजेचं होतं. पण उलट तिनेच मला कम्फर्टेबल केलं. शरयू बघ मी सगळं चांगलं बोललो आहे तुझ्याबद्दल आता तरी लुडोमध्ये चिटिंग करू नकोस. आता नवीन काम, नवीन भूमिका घेऊन लवकरच येतो तुमच्यासमोर. सगळ्यांना खूप खूप प्रेम.”
दरम्यान, सचिन देशपांडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं, ‘पारु’ मालिकेपूर्वी तो बऱ्याच मालिकेत झळकला होता. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘काव्यांजली’, ‘हृदयी प्रीत जागते’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘अजूनही चांदरात आहे’, ‘होणार सून मी ह्या घरची’ या लोकप्रिय मालिकेत सचिन महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. एवढंच नव्हे तर त्याने आपल्या अभिनयाचा ठसा हिंदीत उमटवला आहे.