Zee Marathi Award 2024: ‘झी मराठी पुरस्कार २०२४’ सोहळा २६ आणि २७ ऑक्टोबरला प्रसारित होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता हा लोकप्रिय सोहळा दोन दिवस पाहायला मिळणार आहे. सध्या या सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने आईसाठी सादर केलेल्या कवितेचा व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. संकर्षणच्या या कवितेने इतर कलाकार मंडळींचे अश्रू अनावर झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.

संकर्षण कऱ्हाडेने सादर केलेली आईसाठीची कविता…

आज म्हटलं स्वतःला जाब विचारावा…आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा… आपण पहाटे उठलोय अन् आई दुपारी, असं कधी घडलंय?…आपण जेवाच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय?…बरं तुम्ही घरी येताना आईसाठी कधी, काय आणता?…बरं तुम्ही सांगा स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता?…आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये?…आई करते, आपण नाही करत…देवा, आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये?…पाहिला का कधी, आई शेवटची कधी ऑनलाइन आलीये?…तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो…तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो?…तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून…आपण काहीही करत नसताना तरीही बाळा कोणी बोललं की तिचं मन येतं भरून…आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून…लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, नशीबा पुढे, दैवा पुढे माझ्या बाळाचं भलं होऊ दे…लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते…पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते…आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना…तिचा खडबडीत हात हातात घेऊन कधीतरी बघाना…किती ही कर्तुत्व गाजावा तुमची झेप कमी पडते…आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते…उगाच कशाला आध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता…आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे आहे म्हणता…आईला सतत मुलाचा ध्यास, त्याच्या प्रेमाची धुंदी…बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी…नका करू स्पर्धा कोणाशी नको कोणाचा हेवा…जग जिंकायचं आहे का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप अडकला लग्नबंधनात, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

संकर्षण कऱ्हाडेची आईसाठीची कविता ऐकून अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, श्वेता शिंदेसह अनेक कलाकारांचे डोळे पाणावलेले पाहायला मिळत आहे. संकर्षणचा हा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. अभिनेता शशांक केतकरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर करून संकर्षणचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – कौस्तुकास्पद! सामाजिक भान ठेवून पृथ्वीक प्रतापने साधेपणाने केलं लग्न, म्हणाला, “दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी…”

तसंच एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिलं की, आई गं! काय लिखाण आणि काय सादरीकरण…जिंकलस रे जिंकलस. तर दुसरा नेटकऱ्याने लिहिलं, “कितीही वेळा ऐकली तरीही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात…काय लिहिलंय दादा…खरंच खूप छान.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “रडवलंस मित्रा…आई विना स्वामी तिन्ही जगाचा भिकारी हे परत एकदा सिद्ध केले. खूप छान संकर्षण.”