कार्यक्रमाची दोन पर्वं यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर अनेक वर्षांनी आता ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचे तिसरं पर्व गेल्याच आठवड्यात सुरू झालं. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर आता या परवाच्या दुसऱ्या भागात अभिनेता श्रेयस तळपदे याने हजेरी लावली.
या कार्यक्रमात उपस्थित राहून श्रेयस तळपदेने दिलखुलासपणे गप्पा मारल्या. त्याने त्याच्या करिअरमधील त्याचबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक चांगल्या घडामोडी, त्याला खुपणाऱ्या गोष्टी शेअर केल्या. या वेळी त्याने त्याच्या आयुष्यातील काही गुपितंही उघड केली. तर त्याने त्याच्या क्रशचं नावही या कार्यक्रमात सांगितलं.
या कार्यक्रमातील एका सेगमेंटमध्ये अवधूतने श्रेयसला त्याची क्रश कोण, असं विचारलं. यावर श्रेयसने क्षणाचाही विलंब न करता माधुरी दीक्षित असं उत्तर दिलं. तो म्हणाला, “मला असं वाटतं की मोठं होत असताना आपल्या वयातील सर्वांचंच क्रश माधुरी दीक्षित आहे. पण आतापर्यंत मला कधीही तिच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही. काम करण्याची संधी तर दूरच पण आतापर्यंत आम्ही फक्त एकदाच लिफ्टमध्ये भेटलो आहोत. त्या पलीकडे आमची कधी भेटही झाली नाही आणि ते खूप दुर्दैवी आहे.”
हेही वाचा : Video: रश्मिका मंदानाला पाहून श्रेयस तळपदे फिदा; म्हणाला, “सिर्फ मेरेकु देखि नहीं…”
श्रेयसचं हे बोलणं ऐकून अवधूतनेही त्याला लगेचच “तुझ्या मनातली ही इच्छा लवकरच पूर्ण होईल,” असं म्हणत शुभेच्छा दिल्या. तर हा खास भाग आज रात्री प्रेक्षकांना ‘झी मराठी’वर पाहता येणार आहे.