सध्या सर्वत्र ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ची चर्चा आहे. यंदाचा ‘झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा’ हा खूप खास ठरणार आहे. यांचं कारण म्हणजे अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहता येणार आहेत. त्याचबरोबर ‘पुष्पा’फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना या सोहळ्यात खास हजेरी लावून एक ठसकेबाज लावणी सादर करणार आहे. दरवर्षी ‘झी गौरव पुरस्कार सोहळ्यात मनोरंजन सृष्टीतील एका दिग्गज कलाकाराला जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आहे.
अशोक सराफ गेली अनेक दशकं आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. पन्नासच्या वर हिंदी चित्रपट, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं आणि पुरस्काराचं अर्धशतक एवढा त्याचा प्रचंड प्रवास आहे आणि जो आजही तेवढ्याच ताकदीने सुरू आहे. त्यांच्या याच योगदानाचा गौरव झी मराठी त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
अशोक सराफ यांना हा पुरस्कार त्यांच्याबरोबर काम केलेल्या अभिनेत्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सर्वांचाच उर अभिमानाने भरून आला. त्यांना हा पुरस्कार दिल्यावर सुबोध भावेने अशोक मामांबद्दल वाटणाऱ्या भावना सर्वांसमोर व्यक्त केल्या. “एका माणसामुळे संपूर्ण इंडस्ट्री ओळखली जाते.. मराठी इंडस्ट्री म्हणजे अशोक मामा ज्याच्यात काम करतात ती इंडस्ट्री. त्यांच्या कामावर आमची अख्खी पिढी पोसली गेली, त्यांना बघत बघत आम्ही काम करत आलो, त्यांना बघत बघत आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेत आलो. आताच्या आमच्या सतत सगळं ओरबाडून घेण्याच्या काळात तुझ्यासारखा कलाकारांच्या संस्कृतीला, तत्त्वांना घट्ट धरून काम करणाऱ्या आणि आम्हा सगळ्यांवर तितकीच मायेची ऊब धरणाऱ्या तुला आम्हा सर्वांकडून मानाचा मुजरा,” असं म्हणत सुबोधने अशोक मामांना वाकून मुजरा केला.
हे पाहताच अशोक मामाही खूप भावूक झाले. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील कित्येक मोठमोठे कलाकार उपस्थित होते. त्या सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना रविवार २६ मार्च संध्या. ७ वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.