अभिनेता सुयश टिळक हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आतापर्यंत तो विविध नाटकं, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. तर आता त्याने केलेल्या एका पोस्टने लक्ष वेधलं आहे.
सुयश टिळक नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. सोशल मीडियावर सक्रिय राहून तो त्याच्या कामाबद्दलचे आणि याचबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट्स चाहत्यांना देत असतो. ९ वर्षांपूर्वी आलेल्या ‘का रे दुरावा’ या मालिकेने त्याला वेगळी ओळख मिळवून दिली. या मालिकेतील त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. या मालिकेत त्याच्याबरोबर अभिनेत्री सुरुची अडारकर प्रमुख भूमिकेत झळकली. आज या मालिकेचा प्रवास सुरू होऊन होऊन ९ वर्षं झाली आहेत आणि याच निमित्ताने सुयशने एक खास पोस्ट केली आहे.
या मालिकेचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत त्याने लिहिलं, “१८ ऑगस्ट २०१४ ह्याच दिवशी काही वर्षांपूर्वी हा का रे दुरावा चा प्रवास सुरू झाला. २०१६ मध्ये मालिका संपली पण त्या मालिकेने जोडले गेलेले प्रेक्षक आजही त्या कथेवर पात्रांवर भरभरून प्रेम करतात भेटले की आवर्जून आठवण सांगतात. आपण करत असलेल्या केलेल्या कामांची अशी पोचपावती मिळत राहते तेव्ह नवीन उत्साह उर्जा मिळते. आज ईतक्या वर्षांनी पुन्हा हे पात्र साकारले तर नक्कीच त्यात अनुभवामुळे आलेलं शहाणपण येईल आणि आधी केलं त्यापेक्षा चांगलं काम करता येईल त्या साठी तुम्हा सर्वांचेच खूप आभार.”
तर आता त्याची ही पोस्ट खूप व्हायरल होत असून त्यावर कमेंट करत त्याचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. तर आजही त्या मालिकेतील सुयशचं काम स्मरणात असल्याचं त्याचे चाहते कमेंटमध्ये सांगत आहेत.