मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराज कुलकर्णी याने मनोरंजन सृष्टी पाऊल टाकत स्वतःची ओळख निर्माण केली. आज तो एक लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आहे. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. तर आता त्याने शेअर केलेली एक रोमँटिक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.
गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विराजसने अभिनेत्री शिवानी रांगोळेशी लग्नगाठ बांधली. शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं. त्या दोघांचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडते. आता त्याने शिवानीबरोबर पावसात भिजतानाचा एक व्हिडीओ शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.
विराजसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो आणि त्याची पत्नी शिवानी रांगोळी बिल्डिंगच्या गच्चीवर पावसात भिजताना दिसत आहेत. तर या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला त्याने मिलिंद इंगळे यांच्या ‘गारवा’ अल्बममधील सुपरहिट गाणं लावलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं, “पाऊस पडतोय आणि मागे गारवा मधली गाणी वाजत नाहीयेत असं होणं शक्यच नाही! आपल्या या लाडक्या अल्बमला २५ वर्षे पूर्ण होत आहेत हे ऐकल्यावर परत एकदा वाटतं, पुन्हा पावसाला सांगायचे, कुणाला किती थेंब वाटायचे…!”
त्या दोघांचा हा रोमँटिक व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांना आवडला असून या व्हिडीओवर कमेंट करत चाहते पुन्हा एकदा त्यांच्या बॉण्डचं कौतुक करत आहेत.