टीव्हीवरील एकेकाळचं लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं मराठमोळी अभिनेत्री मुग्धा चाफेकर आणि रविश देसाई वेगळे झाले आहेत. त्यांनी लग्नानंतर ९ वर्षांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. दुसरीकडे अभिनेता अमन वर्मा आणि वंदना लालवानी यांचाही ९ वर्षांचा संसार मोडला आहे. त्यानंतर आता आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

आता ज्या सेलिब्रिटी जोडप्याच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत, ते म्हणजे अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी व अभिनेता विवेक दहिया होय. विवेक व दिव्यांका यांनी ८ जुलै २०१६ मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. आता या दोघांच्या नात्यात दुरावा आला असून ते घटस्फोट घेणार आहेत, अशा चर्चा होत आहेत. या चर्चांवर विवेक दहियाने प्रतिक्रिया दिली आहे.

विवेक दहिया नेमकं काय म्हणाला?

Vivek Dahiya reacts on Divorce rumors with Divyanka Tripathi :” विवेक म्हणाला, “खरं तर या सगळ्या चर्चा पाहून खूप गंमत वाटतेय. मी आणि दिव्यांका हसत होतो. आम्ही आईसक्रीम खाता खाता या बातम्या वाचत होतो. खरं तर या चर्चा आणखी जास्त असत्या तर कदाचित आम्ही पॉपकॉर्नही मागवले असते. या चर्चा म्हणजे फक्त मनोरंजन आहे, दुसरं काही नाही. मी युट्यूब व्लॉगिंग करतो, त्यामुळे क्लिकबेट काय ते मला माहीत आहे. हे बिझनेस मॉडल मी समजू शकतो. कारण जेव्हा तुम्ही असे सनसनाटी असणारे थंबनेल वापराल तेव्हाच लोक व्हिडीओ पाहायला येतील. त्या व्हिडीओमध्ये तसं काहीच नसतं. अशा फालतू बातम्या येत राहतात, हे सगळं फेक आहे.”

दिव्यांका व विवेक यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र फिरायला जातात, तिथले फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. त्यांचे लाखो चाहते आहेत.

विवेक व दिव्यांका यांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचं झाल्यास ते ‘ये है मोहब्बतें’ मालिकेच्या सेटवर भेटले होते. या मालिकेत दिव्यांका मुख्य भूमिकेत होती, तर विवेकने पोलिसाची भूमिका केली होती. दोघेही एकत्र काम करता करता जवळ आले आणि नंतर प्रेमात पडले. काही काळ डेट केल्यावर त्यांनी लग्न केलं आणि आता ९ वर्षांपासून ते आनंदाने संसार करत आहेत. याचदरम्यान त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होऊ लागल्याने चाहत्यांना काळजी वाटत होती, पण हे सगळं खोटं असल्याचं विवेकने स्पष्ट केलंय.

‘बनू मैं तेरी दुल्हन’, ‘ये है मोहब्बतें’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली दिव्यांका सध्या टीव्हीपासून दूर आहे. दिव्यांकाने नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलं की ती आजारी आहे. दिव्यांकाला डेंग्यू झाला असून ती त्यातून बरी होत आहे. चाहते ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.