अभिनेत्री अदिती द्रविड हिने आतापर्यंत विविध मालिकांमधून तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. ती ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत झळकली. या मालिकेत तिने नंदिनी हे पात्र साकारलं होतं. तर यानंतर ती ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता तिला तिची जात विचारणाऱ्या एका नेटकऱ्याला अदितीने उत्तर दिलं आहे.
अदिती सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी ती सोशल मीडियावरून शेअर करत असते. तर आता तिचा तिच्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेतलं. या सेशनदरम्यान तिने तिच्या चाहत्यांच्या बऱ्याच प्रश्नांना उत्तर दिली.
या सेशनदरम्यान एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला की, “तुझी जात काय आहे?” यावर अदितीने दिलेल्या उत्तराने लक्ष वेधलं आहे. चाहत्याचा हा प्रश्न शेअर करत तिने कसलंही उत्तर न देता फक्त एक स्मितहास्याचा इमोजी शेअर केला. तिचा हा इमोजी खूप काही सांगून गेला. फक्त एक इमोजी शेअर करून तिने तिच्या जातीबद्दल प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्याची बोलती बंद केली.
हेही वाचा : “मुंबईच्या ज्या रस्त्यांवरून आजपर्यंत…” अदिती द्रविड रमली जुन्या आठवणीत
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अदितीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर तिने तिचा स्वतःचा कपड्याचा ब्रॅण्ड सुरू केला. या तिच्या ब्रॅण्डचं नाव ‘द ड्रेसवाली. को’ असं आहे. तर आता यानंतर आदिती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार याची चाहते वाट पाहत आहेत.