अभिनेत्री आदिती सारंगधरने जून महिन्याच्या सुरुवातीलाच एक वक्तव्य केलं होतं. त्यात तिने ती गरोदर असताना तिला बिअर प्यायचे डोहाळे लागले होते असं सांगितलं होतं. तिने एका मुलाखतीत खुलासा होता. याच महिन्यात तिने हे वक्तव्य केलं. नाटक, मालिका, चित्रत्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या आदितीला वेगळ्या ओळखीची गरज नाही. मात्र तिच्या या वक्तव्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं.
आदिती काय म्हणाली होती?
जून महिन्याच्या सुरुवातीला आरपार या युट्यूब चॅनलला आदितीने मुलाखत दिली होती. तिने केलेल्या या वक्तव्यानंतर तिला चांगल्याच ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. मी गरोदर असताना बिअरचे डोहाळे लागले होते. त्या दिवसांमध्ये मी सॅलेड खायचे आणि बिअर प्यायचे. जर बिअर प्यायले नाही तर कसंतरीच व्हायचं. मी याबाबत डॉक्टरांना विचारलं. त्यावेळी मला डॉक्टर म्हणाले दोन दोन घोट प्या. मग मी नऊ महिने दोन-दोन, तीन-तीन घोट बिअर प्यायचे. असं आदिती म्हणाली होती. ज्यानंतर तिला चांगल्याच टीकेला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर आता आदितीने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
मी डाएट फॉलो करणारी मुलगी आहे
मी घरातली भाजी, भाकरी, पोळी, वरण-भात खाणारी मुलगी आहे. मी बाहेरचा वडापाव अनेक वर्षे खाल्लेला नाही. मी बाहेर जेवायला अनेक वर्षे गेलेले नाही. मात्र जेव्हा गरोदर होते तेव्हा मला बिअर प्यायचे डोहाळे लागले होते. मला अतरंगी डोहाळे लागले होते. दिवसाला पंचवीस उलट्या होत होत्या. मी ग्रेसफुल नावाचं नाटक करत होते ते बंद करावं लागलं. लक्ष्यचं शुटिंग बंद करावं लागलं. असंही आदिती सारंगधरने सांगितलं. इट्स मज्जा या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आदिती सारंगधरने हे वक्तव्य केलं आहे.
गरोदर असताना घटाघटा बिअर प्यायले नाही
बिअरचे डोहाळे मला लागले होते. मी काही घटाघटा बिअर प्यायले नाही. लोकांनी त्याचं उगाचच चर्वण केलं. ज्याला होतं त्याला ते कळतं. मी कधीही मद्य घेत नाही. मी कधीही ड्रिंक्स घेत नाही. एरवी पार्टी असेल तरीही मी सात वाजता झोपलेली असते. पण जेव्हा गरोदर होते तेव्हा मला जे वाटलं ते वाटलं. मी त्या काळात थंड पाणीही पित होते. इतकं थंड पाणी मी कधीही प्यायले नव्हते. मी रोज गरम पाणी प्यायचे. मी गरोदर असताना मात्र मला बर्फासारखं थंड पाणी लागायचं. बिअरचा एक घोट प्यायचे. तो वास, एखादा घोट हे मला वाटत होतं. मला डोहाळे लागले होते. ते वाटत होतं त्याला आता काय करणार? असं म्हणत आदिती सारंगधरने तिचं जे ट्रोलिंग झालं त्यावर उत्तर दिलं आहे.
सोशल मीडिया आल्याने लोकांना चर्वण करणं सोपं झालं आहे
सध्याच्या घडीला सोशल मीडिया आल्याने लोकांना चर्वण करणं सोपं झालं आहे. सुहास आणि मी देखील लिव्ह-इनमध्ये होतो त्यानंतर मी आणि त्याने लग्न केलं. लोक मात्र आता त्या सगळ्याच गोष्टींचं चर्वण करतात. लिव्ह इन ही काही नवी पद्धत नाही. सेमी कमिटेड रिलेशनशिप हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. लग्न संस्कृती आपण जपली पाहिजे असं मला वाटतं. जर जपायची तयारी नसेल तर लिव्ह इन मध्ये राहू शकता पण त्यातही कमिटमेंट महत्त्वाची आहे असंही मत आदिती सारंगधरने म्हटलं आहे.