९०च्या दशकापासून ते आजवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेलं नारकर कपल नेहमी चर्चेत असतं. आपल्या अभिनयाबरोबरच ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांनी नात्यामधला साधेपणा आजही जपला आहे. त्यामुळे रंगभूमीवर जमलेली ही जोडी प्रेक्षकांना कायम आवडते.
एव्हरग्रीन ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नेहमी फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. तसंच नातं टिकवण्यासाठी सल्ले देत असतात. नुकतंच ऐश्वर्या नारकर यांनी अविनाश नारकर यांच्याबरोबरची जुनी आठवण शेअर केली आहे.
हेही वाचा – ड्रीम प्रोजेक्ट ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानची झाली होती ‘अशी’ अवस्था, किरण रावने केला खुलासा
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी १९९७ व २०२४ मधला अविनाश यांच्याबरोबरची फोटो रील शेअर केली आहे. ही रील शेअर करत ऐश्वर्या यांनी लिहिलं आहे, “आपल्या मुळांना, परंपरांना धरून राहा, एकत्र प्रगती करा आणि या प्रवासाचा आनंद घ्या”
ऐश्वर्या नारकर यांच्या या रीलवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलं आहे. रुपल नंद, सुरुची अडारकर, आशुतोष गोखले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ‘जगातलं सुंदर कपल आहे हे’, ‘आता जास्त तरुण वाटतं आहात’, ‘वर्षे निघून गेली तरी आपण दोघे अजून फिट आणि हिट आहात’, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश हे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. तर ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत दिसत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे.