मनोरंजनसृष्टीत अनेक वर्षांपासून अनेक कलाकारांना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना प्रसंगांना सामोरे जावू लागले आहे. आतापर्यंत अनेकांनी कास्टिंग काऊचच्या त्यांना आलेल्या अनुभवावर खुलेपणाने भाष्य केले आहे. आता अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने याबाबत मौन सोडत तिला आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला ‘पवित्र रिश्ता’ मालिकेने नवी ओळख दिली. आतापर्यंत ती अनेक मालिका, चित्रपट, रिॲलिटी शोजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. तिला आलेल्या चांगल्या-वाईट अनुभवांबद्दल ती मोकळेपणाने बोलताना दिसते. आता तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगत तिने मनोरंजनसृष्टीची काळी बाजू समोर आणली आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली की, वयाच्या १९ व्या वर्षी तिला मनोरंजनसृष्टीत पाऊल टाकायचं होतं. तेव्हा तिला एका दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम करण्याची ऑफर मिळाली. त्यासाठी तिला मीटिंगनिमित्त बोलावण्यात आलं. एक व्यक्ती तिला त्याच्याकडे घेऊन गेली. त्यांचं सगळं बोलणं ठरल्यावर त्या व्यक्तीनं तिला थेट सांगितलं, “तुला तडजोड करावी लागेल.” त्यावर तिनं त्या निर्मात्याला विचारलं, “कसली तडजोड?” त्यावर तो म्हणाला, “तुला निर्मात्याबरोबर एक रात्र काढावी लागेल.”
त्यांचं हे बोलणं ऐकल्यावर अंकिताला धक्का बसला. अभिनेत्रीमध्ये किती टॅलेंट आहे याच्याशी निर्मात्याला काहीही देणं-घेणं नव्हतं, असंही ती म्हणाली. त्यानंतर तिनं त्या निर्मात्याला आणि त्याच्याकडे घेऊन गेलेल्या त्या व्यक्तीला चांगलीच अद्दल घडवली. असा अनुभव तिला एकदा नाही तर दोनदा आला आहे, असा खुलासाही तिनं केला. अंकिताचं हे बोलणं ऐकून आता सर्वांनाच धक्का बसला आहे.