Asha Negi Casting Couch Experience : आशा नेगी ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘बारिश’मधील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. मालिकांमध्ये मुख्य भूमिका करण्याआधी एकता कपूर ‘सपनों से भरे नैना’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकांमध्ये तिने काम केलं होतं. आशाने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या. काम मिळवण्यासाठी तडजोड करावी लागेल, असं एक कोऑर्डिनेटर सांगत होता, तो प्रसंग तिने कथन केला.
‘हॉटरफ्लाय’शी बोलताना तिने कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला. “तेव्हा कोऑर्डिनेटर्स असायचे. मला एक माणूस भेटला जो मला सांगत होता की टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील काम कसे चालते. तेव्हा मी फक्त २२ वर्षांची होते. हळूहळू त्याने माझे ब्रेनवॉश करण्यास सुरुवात केली आणि मी तडजोड करून यशस्वी होऊ शकते, नाहीतर मी काहीच करू शकणार नाही, असे तो मला सांगत होता. तो तडजोड करण्याबद्दल थेट बोलत नव्हता पण त्याचा हेतू तोच होता,” असा अनुभव आशाने सांगितला.
आशाला त्याचा हेतू समजला, मग तिने त्याला स्पष्ट उत्तर दिलं.”जर हे सगळं असं असेल तर मला त्यात काहीच रस नाही,” असं आशा त्याला म्हणाली. आत्मविश्वासाने त्याला उत्तर दिलं असलं तरी आतून मात्र घाबरले होते, असं तिने सांगितलं. यानंतर तिने या गोष्टी तिच्या एका मित्राला सांगितल्या. त्यावर त्याने म्हटलं ही या सगळ्या गोष्टी इंडस्ट्रीत घडतात आणि त्या खूप सामान्य आहेत, मी सांगितलं त्यात त्याला काहीच आश्चर्य वाटलं नाही हे पाहून धक्का बसला असं आशा म्हणाली.
“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, बॉलीवूड अभिनेत्रीला मदत मागितल्यावर कारमध्ये आला भयंकर अनुभव
शाळेत घडलेली ती घटना
आशा नेगीने तिच्याबरोबर शाळेत असताना घडलेला विनयभंगाचा प्रसंग सांगितला. “मी माझ्या मैत्रिणीबरोबर चालत जात होते. तेव्हा सायकलवरून आलेल्या एका माणसाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मला धक्का बसला होता आणि त्याक्षणी मला ओरडायचं होतं, पण माझा आवाजच निघत नव्हता. त्यानंतर घरी आल्यावर मी खूप रडले होते,” असं आशा म्हणाली.
कॉलेजमध्ये घडलेला प्रसंग
दुसरी घटना आशा कॉलेजला असताना घडली होती. त्यावेळी एका माणसाने तिला गर्दीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. यावेळी तिने त्याला जाब विचारला. “मी त्याला विचारलं, ‘काय केलंस तू?’ तो म्हणाला, ‘काय?’ मी चिडले आणि त्याच्यावरओरडले, ‘तू काय केलंस हे तुला माहीत नाही का?’ यानंतर मी त्याला खूप मारलं. त्यानंतर इतरही लोक जमा झाले आणि त्यांनीही त्याला मारहाण केली. त्यांनी केलेल्या मदतीसाठी मी त्यांचे आभार मानायला हवे होते,” असं आशाला वाटतं.
टीव्ही मालिकांमध्ये काम केल्यावर आशा चित्रपटांकडे वळली. तिने अनुराग बासूच्या ‘लुडो’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. नुकतीच तिची ‘हनीमून फोटोग्राफर’ ही सीरिज जिओ सिनेमावर रिलीज झाली.