‘आई कुठे काय करते’मध्ये अनघाची भूमिका साकारत अभिनेत्री अश्विनी महांगडे सर्वांचीच लोकप्रिय झाली. मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. पण आता गणपतीनिमित्त केलेल्या एका लूकमुळे तिच्या एका चाहतीने काहीशी निराशा व्यक्त केली. त्यावर अश्विनीने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.
अश्विनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या कामाबद्दलची आणि वैयक्तिक आयुष्यबद्दलची माहिती ती सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत देत असते. आता गणपतीनिमित्त तिने तिचा एक खास व्हिडीओ शेअर केला. पण त्यातील तिच्या ब्लाऊजवर केलेलं डिझाईन पाहून एका चाहतीने कमेंट करत तिची नापसंती व्यक्त केली.
अश्विनीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये ती जरीची साडी नेसून गणपतीची पूजा करताना दिसत आहे. तर त्या साडीवर घातलेल्या ब्लाऊजच्या पाठीमागे खड्यांनी गणपती काढलेला आहे. ब्लाऊजच्या पाठीमागे काढलेला हा गणपती तिच्या एका चाहतीला खटकला. तिच्या चाहतीने लिहिलं, “पाठीवर, पदरावर गणपती नसावा असे मला मनापासून वाटतं. शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण तुम्हाला खूपजण फॉलो करातात, आदर्श मानतात. मी ही त्यातलीच एक आहे.. त्या अधिकाराने ही कमेंट करत आहे राग नसावा.. जे वाटलं ते लिहिलं..तुम्हाला ऑल द बेस्ट.”
चाहतीची ही कमेंट अश्विनीने वाचली. त्यावर उत्तर देत अश्विनीने लिहिलं, “पुढच्या वेळी नक्की याकडे लक्ष देऊ. थँक यू.” तर आता चाहतीची ही कमेंट आणि त्यावर अश्विनीने दिलेलं उत्तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.