लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री ४१ वर्षीय चंद्रिका साहाने तिचा २१ वर्षीय पती अमन मिश्रा विरुद्ध तक्रार दिली आहे. पतीने १५ महिन्यांच्या मुलाला जमिनीवर आदळून जखमी केल्याबद्दल तिने पोलिसांत तक्रार दिली. तिचा नवरा त्यांच्या मुलाच्या जन्मावर खूश नाही. त्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचं तिने पोलीस तक्रारीत म्हटल आहे.
‘डीएनएच्या’ रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने पोलिसांना असं सांगितलं की तिचा नवरा त्यांच्या मुलाच्या जन्मावर खूश नव्हता आणि अनेकदा त्याला मारहाण करायचा. तिने मुलाला रडताना पाहिले होते आणि त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणाही दिसल्या होत्या, असंही अभिनेत्रीने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर तिला कळालं की तिच्या पतीने मुलाला जमिनीवर तीनदा आदळलं होतं, त्यानंतर मुलाला मालाड पश्चिम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
चंद्रिका स्वयंपाकघरात असताना तिला मुलाचा रडण्याचा आवाज आला. तिने अमनला बाळाला बघायला सांगितलं, पण तिला पुन्हा रडण्याचा आवाज आला. यानंतर तिने खोलीत धाव घेतली असता तिचा मुलगा जमिनीवर जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्यानंतर तिने त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. शनिवारी, तिने सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर पतीनेच बाळाला जमिनीवर आदळलं होतं, असं तिला फुटेजमध्ये दिसलं. याप्रकरणी बांगूर नगर येथील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “चंद्रिकाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही आम्ही मिश्रा यांच्यावर मुलाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत आणि सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत.”
Video: सुश्मिता सेनचं एक्स बॉयफ्रेंडशी पॅचअप? दोघांचाही ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
चंद्रिकाने सांगितलं की जेव्हा ती अमनला भेटली तेव्हा ती घटस्फोटित होती आणि त्यांचे अफेअर होते. मात्र, अभिनेत्री गरोदर राहिली, तिने गर्भपात करावा अशी अमनची इच्छा होती. पण डॉक्टरांनी तिला तसं न करण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर तिने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा १४ महिन्यांचा झाल्यावर गेल्या महिन्यात त्यांनी लग्न केले. दरम्यान, चंद्रिकाने आतापर्यंत ‘सावधान इंडिया: क्राईम अलर्ट’, ‘सीआयडी’, ‘अदालत’ यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.