Delnaaz Irani Boyfriend : अभिनेत्री डेलनाज इराणी जवळपास १३ वर्षांनी तिच्या घटस्फोटाबद्दल व्यक्त झाली आहे. डेलनाजने अभिनेता राजीव पॉलशी लग्न केलं होतं; १४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांचा संसार मोडला. लग्न कशामुळे मोडलं, याबद्दल डेलनाजने तिचं मत व्यक्त केलं आहे. राजीव व डेलनाज २०१० मध्ये वेगळे झाले आणि २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

राजीव पॉलपासून विभक्त होण्याबद्दल डेलनाज म्हणाली, “खरंतर मी त्याच्यापासून विभक्त झाले त्याच्या बऱ्याच आधी मी त्या लग्नातून बाहेर पडले होते. राजीव नाकारतो, पण त्याची हीच अवस्था होती. त्याला हे सांगायचं नसेल किंवा तो कधी बोलला नाही, पण कधी कधी असं होतं की नात्यात प्रेम व आदर काहीच उरत नाही. माझ्यासाठी नात्यात नात्यात आदर असणं खूप महत्त्वाचं आहे. आता मी पर्सीवर प्रेम करते आणि मला त्याच्याबद्दल खूप आदर वाटतो. जेव्हा एखाद्या नात्यात आदर नसतो तेव्हा त्या नात्यातून बाहेर पडणं कधीही चांगलं.”

“काही लोक आहेत जे आनंदी नसताना संसार करायचं ठरवतात. पण स्वतःशी खोटं का बोलायचं? मला खोटं आयुष्य जगायचं नव्हतं. लोक मला म्हणतात की जर आम्हाला एक मूल असतं तर मी त्याला सोडलं नसतं, पण हे सर्व काल्पनिक आहे,” असं डेलनाजने नमूद केलं.

..पण शेवटी कुठेतरी बिनसलं – डेलनाज

डेलनाज म्हणाली, “आम्ही लग्न केलं तेव्हा मी साडे २२ वर्षांची होते आणि तो अवघ्या २४ वर्षांचा होता आणि आम्ही खूप प्रेमात होतो. आम्ही आयुष्यात संघर्ष करत होतो, आम्ही काय करतोय ते कळतच नव्हतं. संघर्ष करून आम्ही आमची आयुष्ये घडवली, पण शेवटी कुठेतरी बिनसलं. आम्ही वेगळे झालो, आम्ही वेगळे झालो, त्यापूर्वीच माझे लग्न संपले होते. मला आशा होती की हे कधीतरी ठिक होईल, पण भावनिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही नात्यातून बाहेर पडल्यावर काहीच ठिक होत नाही.”

राजीवपासून घटस्फोट घेतल्यानंतर डेलनाज इराणी पर्सीला डेट करत आहे. पर्सी डेलनाजपेक्षा १० वर्षांनी लहान आहे. दोघांनी लग्न केलेलं नाही. पण ते एकमेकांबरोबरचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात; तसेच ते दोघे एकत्र प्रवासही करतात.

डेलनाजच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती सध्या कलर्स टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘मन्नत’ या टीव्ही शोमध्ये दिसत आहे. याआधी ती झोया अख्तरच्या द आर्चीज या चित्रपटात दिसली होती. डेलनाजने ‘कल हो ना हो’ सिनेमात काम केलं होतं. तसेच तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

Story img Loader