लोकप्रिय युट्यूबर अरमान मलिक आपल्या दोन पत्नींबरोबर ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाला आहे. पण हे अनेक प्रेक्षकांना मान्य नसून त्यांनी अरमान मलिकवर टीका केली आहे. यात अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी देखील सामील आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात अरमान मलिक, पायल मलिक आणि कृतिका मलिका या तिघांना पाहून देवोलीनाने सोशल मीडियावरून टीका केली होती. “अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नी भारतात बहुपत्नीत्वाला प्रोत्साहन देत आहेत”, असं देवोलीना म्हणाली होती. देवोलीनाच्या याच टीकेवर ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर येताच पायल मलिकने उत्तर दिलं. ज्यामुळे आता हा वाद आणखी पेटला आहे. देवोलीनाच्या टीकेवर पायल मलिक नेमकं काय म्हणाली? आणि त्यानंतर अभिनेत्रीने काय प्रत्युत्तर दिलं? जाणून घ्या…
‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वातून बाहेर आल्यानंतर पायल मलिकने बऱ्याच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका मुलाखतीमध्ये पायलने देवोलीनाच्या टीकेवर उत्तर दिलं. पायल म्हणाली, “तिने दुसऱ्या धर्मात लग्न केलं आहे. ज्यामुळे तिला खूप ट्रोल केलं होतं.” पायलच्या याच उत्तरावर देवोलीनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती; जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
हेही वाचा – Video: नाच गो बया…,पूजा सावंतचा नऊवारी साडीत जबरदस्त डान्स, एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष
देवोलीनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, “एका व्यक्तीला आंतरधर्मीय विवाह आणि बहुपत्नीत्व विवाह यातील तुलना करण्यासाठी खूप ज्ञान असावं लागतं. माझ्या मते याबद्दल सुशिक्षित लोकांना माहिती असेल. पण ही माझ्या एकटीची समस्या नसून सर्व भारतीयांची जबाबदारी आहे की, बहुपत्नीत्वासारख्या बेकादेशीर कृत्याविरोधात उभं राहायला पाहिजे. हे लोक नॅशनल टेलिव्हिजनवर फ्लॉन्ट करत अभिमानाने सांगत आहेत. बरं, हे एका महिलेचं नशीब आहे. पण त्या महिलांच्या आयुष्याची खिल्ली उडवू नका, जे अशा घटनांमुळे प्रत्येक दिवशी पीडित होतात आणि यामुळे त्या प्रत्येक दिवसाला थोड्या थोड्या आतून मरत असतात.”
पुढे देवोलीनाने लिहिलं, “आपल्या घरात जे काही करायचं आहे ते करा. दोन नाही तर चार, पाच लग्न करा. पण ही वृत्ती समाजात पसरवू नका. ट्रोल करणं हे माझ्यासाठी अजिबात नवं नाहीये. लोकांनी माझ्याविषयी युट्यूबवर अनेक व्हिडीओ केले आहेत. आणि हां, माझा नवरा मुस्लिम असूनही तो आपल्या पत्नीशी खूप प्रामाणिक आहे. तो बहुपत्नीत्वावर विश्वास ठेवत नाही. आम्ही लग्नाआधी एकमेकांना समजून घ्यायला ४ वर्षे घेतली होती. नंतरच लग्न केलं. ७ दिवस नव्हते घेतले.”
त्यानंतर देवोलीनाने पायलचं नाव ने घेता लिहिलं की, तसंच एका महिलेच्या स्वाभिमानाशी तडजोड नाही केली पाहिजे. पण तुझ्या भावना मी समजू शकते. मला माहित आहे तू हे समजू शकत नाही. प्रामाणिकपणे मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतं. पण नंतर मला असं वाटतं की, तुला देखील तेच हवं होतं की, तुझं लग्न तसंच व्हावं. तुमच्यासाठी हा एक युट्यूब कंटेंट असू शकतो. पण माझ्यासाठी नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं चालू ठेवा. माझं झालं आहे.