Pahalgam Terror Attack : गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला २२ एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झाला. या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. ज्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले होते. त्यामुळे सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतच नाही तर जगभरातून या दहशतवादी हल्ल्या विरोधात निषेध व्यक्त करत आहेत.
कलाकार मंडळींनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. अक्षय कुमारपासून ते सोनू सूदपर्यंत सर्व कलाकार मंडळींनी या दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत. हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय कपल दीपिका कक्कर ( Dipika Kakar ) व शोएब इब्राहिम ( Shoaib Ibrahim ) दहशतवादी हल्ल्यापूर्वी पहलगाममध्ये सुट्टी एन्जॉय करत होतं. त्यामुळे पहलगाममध्ये हल्ला झाल्याचं समजताच चाहते चिंता व्यक्त करू लागले. म्हणून अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे.
दीपिका कक्कर ( Dipika Kakar ) व शोएब इब्राहिम अलीकडेच आपल्या कुटुंबियांबरोबर पहलगामला गेले होते. यावेळी त्यांचा मुलगाही त्यांच्याबरोबर होता. पहलगाममधील सफरचे फोटो, व्हिडीओ दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघं खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. त्यामुळे पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करू लागले. तेव्हा शोएबने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आणि सर्व सुरक्षित असल्याचं सांगितलं.
शोएब इब्राहिमने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, “नमस्कार, तुम्ही आमच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत होता. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. आज ( २२ एप्रिल ) सकाळीच आम्ही काश्मीरमधून निघालो आणि आम्ही दिल्लीत पोहोचलो आहोत. तुम्ही आमची विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद.”
दरम्यान, दीपिका कक्करने ( Dipika Kakar ) शोएबबरोबर २०१८ मध्ये दुसरं लग्न केलं. लग्नानंतर तिनं इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचं नाव बदलून फैजा ठेवलं. यापूर्वी दीपिकाचं २०११ मध्ये रौनक सैमसनबरोबर लग्न झालं होतं. परंतु २०१५ मध्ये दोघं विभक्त झाले. दोन वर्षांपूर्वी दीपिका व शोएब आई-बाबा झाले. २१ जून २०२३ ला दीपिकानं एका गोंडस मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव रुहान आहे.