Dipika Kakar reacts on Pahalgam Attack : काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्यापूर्वी दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम जम्मू-काश्मीरमध्ये होते. दिल्लीत सुखरूप परतल्यानंतर या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना त्यांच्या सुरक्षित असल्याची माहिती दिली, पण त्यानंतर या जोडप्याला खूप ट्रोल केलं गेलं.
दीपिकाने आता एक व्लॉग पोस्ट केला आहे. या व्लॉगमध्ये तिने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आणि दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असं विधान केलं. इस्लाममध्ये सर्वांना एकमेकांचा आदर करण्याची शिकवण दिली जाते, असंही दीपिकाने म्हटलं आहे.
दीपिका कक्करने पहलगाममधील हल्ल्याचा निषेध केला आणि म्हणाली, “मला इस्लाममधलं जेवढं कळतं त्यावरून मी प्रामाणिकपणे सांगू शकते की इस्लाम मानणारी कोणतीही व्यक्ती असं कृत्य करू शकत नाही. ते धर्माच्या नावावर कोणाचीही हत्या करणार नाहीत. इस्लाम असो वा इतर कोणताही धर्म, कोणताही धर्म दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीला मारण्याची शिकवण देत नाही. एकोप्याने राहायला आणि एकमेकांचा आदर करायला शिकवलं जातं. जे लोक अशी घृणास्पद कृत्ये करत आहेत ते कोणत्याही धर्माचे पालन करत नाहीत, ते फक्त दहशतवादी आहेत.”
पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या पोस्टनंतर दीपिका-शोएब ट्रोल
दीपिका व शोएब जम्मू आणि काश्मीरमधून परत आल्यावर पहलगाम हल्ला झाला. त्यानंतर चाहते या जोडप्याला ते सुरक्षित आहेत की नाही हे विचारत होते. शोएबने पोस्ट करून तो व त्याचं कुटुंब सुरक्षित आहेत अशी माहिती देणारी पोस्ट शेअर केली आणि लवकरच त्यांचा काश्मीर ट्रिपचा व्लॉग येणार असल्याचं त्यात लिहिलं होतं. यानंतर त्याला खूप ट्रोल करण्यात आलं. लोकांनी त्याला धर्मावरूनही ट्रोल केलं आणि व्लॉगची अपडेट देणं हे अतिशय असंवेदनशील असल्याचं म्हटलं. आता त्याच व्लॉगमध्ये दीपिकाने दहशतवादी हल्ल्याबाबत विधान केलं. “इस्लाम अशा घटनांना कोणत्याही प्रकारे पाठिंबा देत नाही,” असं दीपिका म्हणाली.
दीपिका कक्कर पहलगाम घटनेबद्दल म्हणाली…
“जे व्हिडीओ मी पाहिले, त्यात मला त्या महिला आणि मुलांना पाहून खूप दुःख झालं. आम्ही काही दिवसांपूर्वी तिथे गेलो होतो, पण आम्ही बैसरन इथे गेलो नव्हतो. पण तेथील व्हिडीओ पाहिल्यावर जाणवतं की अचानक घडलेल्या एका भयंकर घटनेत या लोकांनी त्यांच्या कुटुंबातील लोकांना गमावलं. ज्यांनी आपले कुटुंबीय गमावले, ज्या मुलांनी आणि महिलांनी आपले वडील आणि पती गमावले, त्यांचं दुःख आपण कधीच अनुभवू शकत नाही. आपण फक्त संताप आणि राग व्यक्त करू शकतो,” असं दीपिका म्हणाली.