झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका खूप गाजली. या मालिकेत सुबोध भावे, गायत्री दातार व शिल्पा तुळसकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून गायत्रीने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय, मालिकेची कथा त्याचप्रमाणे या मालिकेचं शीर्षकगीतही प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं. तर आता गायत्रीने या मालिकेच्या दुसऱ्या भागाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
सुपरहिट ठरूनही या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो अशा चर्चा रंगल्या होत्या. तर आता या चर्चांवर मौन सोडत गायत्रीने या मालिकेचा पुढील भाग येणार की नाही हे स्पष्ट केलं आहे.
गायत्रीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रश्न उत्तरांचं एक सेशन घेतलं. याचबरोबर गायत्रीने लवकरच काहीतरी नवीन घडणार असल्याची हिंटही चाहत्यांना दिली. त्यावरून अंदाज बांधत चाहत्यांनी तिला विविध प्रश्न विचारले. तर यावेळी एका चाहत्याने तिला विचारलं की, “‘तुला पाहते रे’चा दुसरा भाग येणार का?” तर यावर उत्तर देत गायत्री म्हणाली, “नो.” गायत्रीने ‘तुला पाहते रे २’ येणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर ‘तुला पाहते रे २’ बद्दलच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
गायत्रीचं हे उत्तर सध्या खूप चर्चेत आला आहे. त्यामुळे आता ‘तुला पाहते रे’चा दुसरा भाग येणार नसल्याने ती आगामी काळात प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.