अभिनेत्री हेमांगी कवी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान तिला दुखापत झाल्याचं तिने सोशल मीडियावरून सांगितलं.
हेमांगी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी वरचेवर चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने तिच्या पावलाचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्याचं दिसत आहे. पायाला दुखापत झाल्यामुळे तिला तसंच नाटकाचा प्रयोग करावा लागला.
आणखी वाचा : ‘मी तुमची ही कमेंट दुर्लक्षित करु शकते पण…’ नेटकऱ्याच्या प्रश्नावर भडकली हेमांगी कवी
ही पोस्ट शेअर करत तिने लिहिलं, “परवा ‘मन धागा धागा’ च्या सेटवर सीन करताना माझ्याकडूनच माझ्या पायाला दुखापत झाली. पायरी चढत असताना माझा अंदाज चुकला आणि पाय पायरीला जोरात आपटला. पायाच्या बोटाचं नख माझ्याच बोटात मागच्या मागे घुसलं. असली कळ गेली डोक्यात. शूटींग थांबवून आराम करायची ती वेळ नव्हती कारण आधीच खूप उशीर झाला होता. पॅक अप ल्ची वेळ उलटून गेली होती. काही नाही काही म्हणत सीन पूर्ण केला. पॅक अप झालं. पाय झणझणत होता. चालवत ही नव्हतं. चप्पल घलता येत नव्हती. घरी आल्यावर बघते तर काय पाय टम्म सुजला होता. Fresh होऊन बर्फाचा शेक दिला पण मी इतकी थकले होते की मी झोपी गेले.”
पुढे तिने लिहिलं, “पाय प्रचंड झोंबत होता. पण याहीपेक्षा पाय जर असाच राहीला तर उद्याचा नाटकाचा प्रयोग कसा करणार या विचाराने अस्वस्थ होऊन झोपमोड होत होती. सकाळी नाटकाच्या रेहर्सलला पोचले. मी लंगडतेय पाहून सगळेच काळजीत पडले. आई गं आई गं करत रिहर्सल केली. आराम न दिल्यामुळे जखम खवळली. घरी गेल्या गेल्या मैत्रिणीने सुचवलेला तुरटी-हळदीची लेप लावला पायाला दुखणं शांत झालं. प्रयोगाचा दिवस उजाडला. रक्त साकळून बोट काळं निळं झालं होतं. थिएटरला पोचले. मेकअप, कॉस्च्युम घालून तयार झाले. मी विंगेत उभी होते. तिसरी घंटा झाली. एंट्रीलाच मी धावत ट्रेन पकडतेय असा सीन आहे नाटकात. मी धावले आणि त्यानंतरचे २- २.१५ तास मी रंगमंचावर तरंगत होते.”
हेही वाचा : “काल मला माझी दुर्गा भेटली…” हेमांगी कवीने ‘या’ अभिनेत्रीसाठी केलेली खास पोस्ट चर्चेत
शेवटी तिने लिहिलं, “मला दुखापत झाली आहे हे मी विसरून गेले. काही तासांपूर्वी विव्हळणारी मी जणू काही झालंच नाही अशी वावरले. जादू व्हावी तसं. पण खरंच आहे ही जादूच असते. कलेची जादू. त्यावेळी साकारत असलेल्या पात्रामध्ये आपण उरतच नाही. त्यामुळे आपली दुःखं, यातना, क्लेश शारिरीक आणि मानसिक सुद्धा काही काही उरत नाही. प्रयोग संपल्यावर मला जाणवलं माझं दुखणं खुप कमी झालं होतं. मला वाटतं फक्त अभिनय क्षेत्रच नाही तर जगातली कुठलीही कला तुम्हांला सावरायला मदतच करते. ‘जन्मवारीचा’ पहीला प्रयोग माझ्या कायम स्मरणात राहील. कलादेवता, नाट्यदेवता कालच्या सारखी कृपा कायम ठेवा माझ्यावर !”