Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही महिन्यांपासून या मालिकेसंदर्भातील कॉन्ट्रोवर्सीमुळे जरी प्रेक्षक वर्ग कमी झाला असला तरी या मालिकेतील जुने भाग आवर्जून पाहिले जातात, ज्यामध्ये प्रेक्षकांची लाडकी दयाबेन पाहायला मिळते. या दयाबेनने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री दिशा वकानी हिने दयाबेनची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. पण, २०१८ मध्ये दिशाने मॅटर्निटी लिव्ह घेऊन ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका सोडली. त्यानंतर मालिकेच्या प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली, त्यामुळे दिशाला मालिकेत पुन्हा आणण्यासाठी खूप प्रयत्न झाले. अखेर आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या निर्मात्यांना नवीन दयाबेन भेटली असून दिशाची जागा घेणाऱ्या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सहा वर्षांनंतर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत नव्या दयाबेनची एन्ट्री लवकरच होणार आहे. ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार, दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेणाऱ्या असित मोदींना एक अभिनेत्री पसंत पडली आहे. या अभिनेत्रीला शॉर्टलिस्ट केलं असून टीमने नव्या दयाबेनसह मॉक शूटला सुरुवात केली आहे. आता सेटवरील नव्या दयाबेनचा फोटो समोर आल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या व्हायरल फोटोमध्ये अभिनेत्री काजल पिसाळ पाहायला मिळत आहे. ‘टेली चक्कर’ने काजलचा फोटो शेअर केला आहे.
माहितीनुसार, जेव्हा काजल पिसाळने दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती तेव्हाचा हा व्हायरल फोटो आहे, त्यामुळे काजल दिशाची जागा घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत अद्याप निर्मात्यांकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं नाही. पण, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत लवकरच दयाबेन परतणार हे निश्चित आहे.
दरम्यान, काजल पिसाळच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने राम कपूर व साक्षी तंवर यांची लोकप्रिय मालिका ‘बडे अच्छ लगते हैं’मध्ये काम केलं होतं. या मालिकेत तिने इशिका कपूरची भूमिका साकारली होती. याशिवाय काजलने ‘एक हजारों में मेरी बहना’, ‘साथ निभाना साथिका’सारख्या बऱ्याच मालिकेत काम केलं आहे.