Kavita Kaushik in Badrinath: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक भूस्खलनामुळे उत्तराखंडमध्ये अडकली आहे. ती बद्रीनाथहून परतत असताना भूस्खलनामुळे (Badrinath Landslide) बद्रीनाथ मार्गावरील जोशीमठमध्ये चार दिवसांपासून अडकून पडली आहे. कविता कौशिकने या चार दिवसांत अनेक भूस्खलनाच्या घटना पाहिल्या. कविता सध्या जोशीमठच्या आर्मी कॅम्पमध्ये पती रोनित बिस्वास आणि तिच्या पाळीव श्वानाबरोबर राहत आहे.
‘एफआयआर’ मध्ये चंद्रमुखी चौटालाची भुमिका साकारणारी कविता म्हणाली, “रस्ता मोकळा करण्यासाठी पोलीस, लष्कर आणि बॉर्डरवरील काही संघटना खूप मेहनत घेत आहेत. पण एका ठिकाणी झालेले भूस्खलन साफ करून रस्ता मोकळा करतात, तोवर दुसऱ्या ठिकाणी सारखीच घटना घडते, त्यामुळे बराच वेळ लागत आहे. या दरम्यान सर्व पर्यटक सुरक्षित आणि शक्य तितके आरामदायी व्यवस्थेत राहतील यासाठी त्यांनी सोय केली आहे. हे भयंकर आहे पण मी उत्तराखंड पोलीस आणि लष्कराला सलाम करते की ते सर्व पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहेत.”
‘बाई गं’ सिनेमाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, Swapnil Joshi च्या चित्रपटाने कमावले फक्त ‘इतके’ लाख
पतीचा वाढदिवस साजरा करायला गेली होती कविता
कविता तिचा नवरा रोनित बिस्वास, त्यांचा पाळीव श्वान आणि चुलत भाऊ यांच्यासह ५ जुलैला रोनितचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बद्रीनाथला गेली होती. ते देहरादूनहून बद्रीनाथपर्यंत गाडी चालवत पोहोचले आणि भगवान बद्रीनाथचे दर्शन घेतले. पण परतत असताना ती दरड कोसळली आणि चार दिवसांपासून ते सर्वजण तिथेच अडकले आहेत.
कविताने सांगितलं की बद्रीनाथमध्ये दर्शन घेतल्यानंतर ते लोग माना या गावात गेले. हे चीन व भारताच्या सीमेवरील गाव आहे. “मानाचा प्रवास जणू स्वर्गासारखा होता. आम्ही धबधब्यात आंघोळ केली, पर्वतांवर ट्रेकिंगला गेलो, पण त्याच दिवशी दरड कोसळली आणि आम्ही तीन दिवस मानामध्ये अडकलो. तोपर्यंत मला फार चांगलं वाटत होतं कारण ते खूप सुंदर ठिकाण आहे आणि मला पर्वत आवडतात,” असं कविता म्हणाली.
दोन दरडी कोसळल्या
कविता म्हणाली, “८ जुलैला रस्ता मोकळा झाल्यावर आम्ही जोशीमठला आलो. इथे पोहोचताच आम्हाला कळले की दोन दरडी कोसळल्याने हायवे पूर्णपणे बंद झाला आहे. आता इथे आम्ही तिघे अडकलो आहोत. इथे आम्ही आर्मी कॅम्पमध्ये आहोत, माझ्या पतीचा मित्र आर्मी ऑफिसर आहे आणि ते आमची चांगली काळजी घेत आहेत. पण बरेच लोक इथे अडकून पडले आहेत.”
कविता पुढे म्हणाली, “रेस्टॉरंट आणि हॉटेल्स बाथरूम वापरण्यासाठी २०० रुपये आकारत आहेत. जेव्हा लष्करातील लोकांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तिथे जाऊन हॉटेल कर्मचाऱ्यांना पर्यटकांना मदत करण्यास सांगितलं. इथे हजारो गाड्या अडकल्या आहेत, त्यामुळे किती लोक इथे अडकले असतील याची तुम्ही कल्पना करू शकता.”
“मी चार दिवसांपासून इथे अडकले असून आता मी कंटाळले आहे. आम्हाला लवकरात लवकर देहरादूनला पोहोचायचे आहे कारण मला काशीपूरला एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. इथून निघू शकले नाही तर तिथे वेळेत पोहोचणार नाही. मी कमिटमेंट देऊन ठेवली आहे,” असं कविता कौशिकने सांगितलं.