‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचलं आहे. अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी या पात्रांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. या मालिकेत लवकरच अधिपती आणि अक्षराचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्त कविता लाड यांनी स्वतःच्या लग्नातली एक आठवण शेअर केली आहे.
नुकतंच मालिकेमध्ये अक्षरा आणि अधिपती यांच्या लग्नाच्या हळदीच्या भागाचं शूटिंग झालं. त्यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कविता लाड यांनी त्यांच्या खऱ्या लग्नातील हळदीबद्दल भाष्य केलं. त्या म्हणाल्या. “माझ्या लग्नाला २१ वर्ष झाली. त्यावेळी अशी मोठमोठी लग्न करण्याची पद्धतही नव्हती. हळद,मेहंदी सारखे कार्यक्रम मोठ्या स्वरुपात करण्याचा ट्रेंड नव्हता. जरी असता तरी त्या ट्रेंडमध्ये मी कितपत सहभाग घेतला असता माहिती नाही. कारण मुळात मला साध्या सोप्प्या गोष्टी आवडतात. साधं, सोप्प, घरगुती कमी लोकांमध्ये समारंभ करायला मला जास्त आवडतो.”
कविता लाढ पुढे म्हणाल्या, माझी हळद माझ्या घरातच झाली होती. आमची एकत्र हळद नव्हती. नवऱ्या मुलाची उष्टी हळद आली होती. घरात सगळे नातेवाईक आले होते. चांगला स्वयंपाक केला होता. लग्नातले सगळे समारंभ झाले होते पण ते घरगुती पद्धतीने झाले होते.
हेही वाचा- “मला ही साडी…”, वनिता खरातचे पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट, पतीच्या कमेंटने वेधले लक्ष
कविता लाड यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, चित्रपट, नाटक मालिका यामधून त्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला. चार दिवस सासूचे मालिकेतील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. सध्या त्या तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत भुनेश्वरी पात्र साकारत आहेत. या मालिकेत त्यांच्याबरोबर शिवानी रांगोळे ऋषिकेश शेलार यांची मुख्य भूमिका आहे. एकाबाजूला कविता लाड मालिकेतून मनोरंजन करत असल्या तरी दुसऱ्या बाजूला त्यांचं प्रशांत दामलेंबरोबरच ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक सुद्धा सुरू आहे.