राज्यभर मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आंदोलन करत आहे. उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील देखील आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत पाणीही पिणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, शांततेत सुरू झालेल्या आंदोलनाला काही ठिकाणी गालबोट लागलं आहे. मागच्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत, काही ठिकाणी बसेस फोडण्यात आल्या, यावर अप्रत्यक्ष भाष्य करणारी एक पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेने केली आहे.
“एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?? इंडियाला युनिफॉर्म सिव्हिल कोड (UCC) हवा असेल, पण भारताला युनिफॉर्म सिव्हिल लॉ, तसेच युनिफॉर्म क्रिमिनल लॉची गरज आहे.
सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एस टी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण. चुकून तो दगड चालकाला लागला असता तर?” अशी पोस्ट केतकीने शेअर केली आहे.
दरम्यान, केतकीच्या या पोस्टवर अनेक सोशल मीडिया युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाज शांततेत आंदोलन करत होता, मोर्चा काढत होता, तेव्हा कुणालाच समजलं नाही, त्यामुळे मराठा समाजाने हा मार्ग अवलंबला आहे, असं एका युजरने म्हटलं आहे. ‘केतकी मॅडम माहीत नसेल त्या गोष्टींत डोकं घालू नये… इतके दिवस शांततेत मोर्चे काढले तेव्हा सरकार काय करत होतं?’ असा सवाल एका युजरने विचारला आहे.