अभिनेत्री खुशबू तावडे ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. आतापर्यंत ती विविध मालिकांमधून झळकली. तर आता खऱ्या आयुष्यात बाळाला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आता याबाबत तिने भाष्य केलं आहे.
खुशबू सध्या तिच्या ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेमुळे खूप चर्चेत आहेत. ही मालिका म्हणजे दोन बहिणींची गोष्ट आहे. गेली अनेक दिवस या मालिकेची टीम या मालिकेचं खूप प्रमोशन करत होते. यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खुशबूने आई झाल्यानंतर मालिकांमध्ये प्रमुख भूमिकेत दिसण्याबाबत तिचं मत व्यक्त केलं. तिचा मुलगा तिच्यासाठी लकी चार्म आहे असेही ती म्हणाली.
ती म्हणाली, “पूर्वी विश्वास ठेवायचे नाही पण बाळाचा पायगुण असतो…राघव झाल्यापासूनच खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडत आहेत. किंवा मी गरोदर असल्याचं कळल्यापासूनच आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडायला लागल्या होत्या. त्यामुळे त्याचे श्रेय मी त्याच्या पायगुणाला देईन. दुसरं मला असं वाटतं की हे सगळं तुमच्या मागण्यावर आहे. आता लग्न झाल्यानंतरही अभिनेत्री बॉलीवूड चित्रपट करताना दिसतात तेव्हा लोकांना वाटू लागला आहे की हे शक्य आहे. कारण आधी लग्न झाल्यानंतर अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रातून गायबच व्हायच्या.”
हेही वाचा : सारं काही तिच्यासाठी! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसाठी नवऱ्याने सोडलं गिरगावातील राहतं घर, खुलासा करत म्हणाली…
पुढे ती म्हणाली, “मी 25-26 वर्षाची असताना 35 वर्षाच्या बाईचा रोल केला आहे. आताही करते आहे त्यामुळे याचा फरक पडत नाही. कारण शेवटी तुम्हाला अभिनय करायचा आहे. मला असं वाटतं प्रश्न फक्त उपलब्ध असण्याचा असतो. घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय मी हे करू शकले नसते. माझ्या आई-बाबांचा, माझ्या सासू-सासर्यांचा मला खूप चांगला पाठिंबा मिळत आहे, माझा मुलगा त्यांच्याकडे राहतो म्हणूनच मी पुनरागमन करू शकले.”