अभिनय विश्वात अनेक आंतरधर्मीय जोडपी आहेत, जी आनंदाने एकमेकांचे सण-उत्सव साजरे करतात. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. यानिमित्ताने अनेक सेलिब्रिटी रोजे ठेवत आहेत. हिंदू अभिनेत्याशी लग्न करणाऱ्या एका अभिनेत्रीने तिच्या रमजान सेलिब्रेशनबद्दल माहिती दिली आहे. तसेच हिंदू कुटुंबात लग्न केल्याचा अभिमान असल्याचं वक्तव्यही तिने केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही अभिनेत्री म्हणजे किश्वर मर्चेंट होय. किश्वर ही मुस्लीम असून तिने अभिनेता व गायक सुयश राय याच्याशी लग्न केलं आहे. किश्वरने नुकतीच अभिनेत्री सना खानला मुलाखत दिली. यावेळी किश्वरने तिच्या ४ वर्षांच्या मुलाबद्दल सांगितलं. तसेच रमजानबद्दलही ती व्यक्त झाली.

सना खानने किश्वरला विचारलं की ती आपल्या मुलासोबत रमजानचा महिना कसा घालवते? त्यावर किश्वर म्हणाली, “हे सर्व समजण्यासाठी तो अजून लहान आहे. पण त्याला समजतं की अजान होत आहे. त्याचे आजोबा नमाज पठण करत आहेत. आणि शुक्रवारी जर त्याचे आजोबा त्याला शाळेत न्यायला आले नाहीत, तर त्याला समजतं की आज नमाज आहे, म्हणून त्याचे आजोबा आज आले नाहीत. त्याला हे सर्व माहीत आहे पण रमजानबद्दल समजायला तो अजून लहान आहे.”

किश्वर मर्चेंटने हिंदू अभिनेत्याशी केलंय लग्न

किश्वर पुढे म्हणाली, “जसे मी सर्व सण साजरे करते, तसेच तोही करतो. आणि कधी कधी मी स्वतःला नशीबवान समजते की माझे लग्न हिंदू कुटुंबात झाले आहे. आपण ज्या प्रकारे ईद, दिवाळी, होळी, ख्रिसमस साजरे करतो, ते मला फार आवडतं.” ॲसिडिटीचा त्रास असल्याने मोजकेच रोजे ठेवते, असंही किश्वरने नमूद केलं.

किश्वर मर्चेंटचा पती ८ वर्षांनी आहे लहान

किश्वर मर्चेंट ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अभिनेता सुयश रायशी २०१६ मध्ये आंतरधर्मीय लग्न केलं. सुयश किश्वरपेक्षा ८ वर्षांनी लहान आहे. सुयश व किश्वर यांनी २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं. सुयश हिंदू आहे व त्यांच्या मुलाचं नावही त्यांनी हिंदू धर्माप्रमाणे ठेवलं आहे. या गोष्टीचा अभिमान असल्याचं किश्वर सांगते.