‘ठरलं तर मग’ मालिकेत नुकतीच प्रसिद्ध अभिनेत्री क्षिती जोगची एन्ट्री झालेली आहे. दामिनी देशमुख ही भूमिका मालिकेत क्षिती साकारणार आहे. रुबाबदार, सर्वांना रोखठोक उत्तरं देणारी दामिनी ही अर्जुन सुभेदार विरुद्ध केस लढणार आहे. मात्र, क्षितीने ‘ठरलं तर मग’ मालिका स्वीकारण्यामागे एक खास कारण आहे. क्षिती जोगने नुकतीच पोस्ट शेअर करत याचं कारण सांगितलं आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेची निर्मिती सुचित्रा बांदेकरांच्या सोहम प्रोडक्शनने केली आहे. त्यामुळे क्षितीला दामिनी देशमुख ही भूमिका ऑफर करण्यासाठी स्वत: सुचित्रा बांदेकर व त्यांचा मुलगा सोहम यांनी फोन केलेला असं अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. याशिवाय तिने मालिकेत एन्ट्री झाल्यावर लाडक्या मैत्रिणीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

क्षिती जोगची सुचित्रा बांदेरकरांसाठी पोस्ट

ठरलं तर मग !!!!

माझी निर्मिती असलेल्या सिनेमात तू प्रेमाने काम केलंस…
आता तुझी निर्मिती असलेल्या मालिकेत मी हक्काने काम करतेय…

ते सर्कल का काय ते पूर्ण होतंय…
अनेक वर्षांची आपली मैत्री अशीच कायम राहो…
असंच मस्त काम करत राहू… मजा करू!

Love you!

मंडळी भेटूया उद्यापासून संध्याकाळी ८.१५ वाजता!
आपल्या लाडक्या स्टार प्रवाहवर!

क्षितीच्या या पोस्टवर मराठी सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. क्षितीचा नवरा लोकप्रिय अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने या पोस्टवर, “तुम्ही दोघी एकत्र…या विचाराने घाबरायला होतं!” अशी मजेशीर कमेंट केली आहे. तर, सोहम बांदेकर, सायली संजीव, आनंदी जोशी या सगळ्यांनीच क्षितीला या नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री क्षिती जोग या मालिकेत दामिनी देशमुख ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना क्षिती म्हणाली, ‘ठरलं तर मग संपूर्ण महाराष्ट्राची आवडती मालिका आहे. या मालिकेचा एक भाग होताना अत्यंत आनंद होतोय. दामिनी देशमुख या वकीलाची भूमिका मी साकारणार आहे. दामिनी देशमुख दुसऱ्यांना हरवण्यासाठी नाही तर स्वत: जिंकण्यासाठी केस लढते. साक्षीची केस यापुढे ती लढणार आहे. त्यामुळे हे पात्र साकारण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे अशी भावना क्षिती जोग यांनी व्यक्त केली.”

दरम्यान, क्षितीने उल्लेख केल्याप्रमाणे याआधी सुचित्रा बांदेकरांनी तिची निर्मिती असलेल्या ‘झिम्मा’ सिनेमात काम केलं होतं आणि आता क्षिती सुचित्रा यांची निर्मिती असलेल्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत काम करत आहे.