अभिनेत्री मधुरा देशपांडे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून मधूराने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मधुराने आशय गोखलेबरोबर २० जानेवारी २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. मधुरा आणि आशयने काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मधुराचे आई-बाबा आणि आशयचे आई-बाबा मित्र आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत मधुराने आशयबरोबच्या तिच्या पहिल्या डेटचा किस्सा सांगितला आहे.
मधुरा म्हणाली, “आमच्या घरात सगळे १० वाजता झोपून जातात आणि आशय रात्री ९.३० वाजता मित्रांना भेटायला बाहेर पडायचा. मी संध्याकाळी ६ ते ७ वाजता मित्र-मैत्रिणींना भेटायला जायचे आणि रात्री ९ वाजेपर्यंत घरी येऊन जेवण करुन १० पर्यंत झोपून जायचे आणि सकाळी ५ वाजता उठायचे. त्यावेळी आशयने मला रात्री जेवायला भेटूयात असं सांगितलं. मला वाटलं ८ पर्यंत आम्ही भेटून आणि रात्री ११ वाजेपर्यंत मी घरी जाईन. त्यानंतर आशयचा मेसेज आला की आपण ९.३० ते १० पर्यंत भेटूत. मी म्हणलं १० वाजता मला झोप येते. जेव्हा आम्ही त्याच्या मित्रांना भेटायचो तेव्हा १० वाजता मी जांभया द्यायचे. आणि त्याचे मित्र विचार करायचे ही काय करत आहे.”
मधुराच्या कामाबाबत बोलायचं झालं तर ‘इथेच टाका तंबू’ या मालिकेतून मधुराने अभिनयक्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर तिने बसस्टॉप, गुलाबजाम सारख्या चित्रपटात काम केलं. २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिवलगा’ मालिकेत तिने महत्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेत तिच्याबरोबर सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका होती. सध्या स्टार प्रवाहवरील ‘शुभमंगल’ या मालिकेमध्ये मधूरा मुख्य भूमिका साकारत आहे. जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या या मालिकेत मधुरा देशपांडेबरोबर, विशाखा सुभेदार यशोमन आपटे, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल देशपांडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.