इस्रायल व हमास यांच्यादरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत शेकडो नागरिकांनी जीव गमावला आहे, तर हजारो नागरिक जखमी आहेत. या युद्धात टेलिव्हिजन अभिनेत्री मधुरा नाईकचे बहीण व भावोजी मारले गेले. तिने याबद्दल पोस्ट शेअर करून माहिती दिली होती. त्यानंतर आता कुटुंबातील ३०० सदस्य युद्धग्रस्त इस्रायलमध्ये अडकले असल्याचं तिने सांगितलं आहे.

पॅलेस्टाईनमधील दहशतवाद्यांकडून भारतीय अभिनेत्रीच्या बहिणीची इस्रायलमध्ये मुलांसमोर निर्घृण हत्या, माहिती देत म्हणाली…

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ‘नागिन’ फेम मधुरा नाईक म्हणाली, “माझ्या कुटुंबाने मला त्यांच्या (बहीण व भावोजी) बेपत्ता झाल्याची माहिती दिली आणि २४ तासांनंतरच त्यांचे मृतदेह आढळले. त्यांच्याबरोबर त्यांची मुलंही कारमध्ये होती. ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी कारमधून मुलांना नेलं.” दरम्यान, मधुराची आई मूळची इस्रायलमधील ज्यू आहे. त्यांना अनेकदा अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे, असंही मधुराने नमूद केलं.

“दुर्दैवाने इस्रायलमध्ये नेहमीच अशी परिस्थिती राहिली आहे, आम्ही नेहमीच अशा अनेक परिस्थितींचा सामना केला आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे माझे कुटुंब चिंतेत आहे. मला माझ्या सोशल मीडिया पोस्टमध्ये याबद्दल बोलणं आवश्यक आहे असं वाटलं, त्यामुळे मी शेअर केलं. सुरक्षेच्या कारणास्तव मी आत्ता कुठे आहे हे सांगू शकत नाही, तसेच इस्रायलमध्ये घरातील कोणते सदस्य अडकले आहेत हेही मी सांगू शकत नाही,” असं मधुराने सांगितलं.

“या कठीण काळात आमच्या आणि इस्रायलमधील लोकांच्या पाठिशी उभे रहा. या दहशतवाद्यांचा खरा चेहरा आणि ते किती क्रूर असू शकतात हे लोकांनी पाहण्याची हीच वेळ आहे,” असं मधुराने इस्रायलमधील परिस्थितीबद्दल म्हटलं होतं.

Story img Loader