मागील चार दिवसांपासून इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू आहे. शनिवारी (७ ऑक्टोबर) पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतर युद्धाला सुरुवात झाली आहे. यात आतापर्यंत हजारो निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. या युद्धाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर आता या युद्धात अभिनेत्री मधुरा नाईकची बहीण आणि भाओजी ठार झाले आहेत. त्याबद्दल मधुराने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली.

‘नागिन’ फेम मधुरा नाईक हिने सोशल मीडियावरून तिच्या बहिणीची आणि भाओजींची पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवाद्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याचं सांगितलं. या दोघांची हत्या त्यांच्या मुलांच्या डोळ्यांदेखत करण्यात आल्याचं अभिनेत्री म्हणाली.

आणखी वाचा : Israeli-Palestinian Conflict: “डोक्यावरून रॉकेटचा हल्ला अन्….” इस्रायल अभिनेत्याने शेअर केला युद्धाचा व्हिडीओ

मधुराने सोशल मीडियावर तिची बहीण ओदाया, बहिणीचा नवरा आणि त्यांच्या मुलांचा फोटो शेअर करत लिहिलं, “ओदाया, माझी बहीण आणि तिच्या नवऱ्याची त्यांच्या मुलांसमोर पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवाद्यांकडून अमानुषपणे हत्या करण्यात आली. माझ्या बहिणीचा मृत्यू झाल्याने मी खूप दुःखी आहे. तिचा नम्रपणा, तिचं प्रेम याची नेहमीच आठवण येत राहील. आम्ही आणि आमच्या प्रार्थना तिच्या आणि इस्रायलमधील सगळ्या पीडितांच्या पाठिशी आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो.”

हेही वाचा : “कोणत्याही प्रकारचा दहशतवाद…”, हमास व इस्रायल युद्धावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया; म्हणाला, “लोकांना मारणे हे…”

पुढे तिने लिहिलं, “कृपया या कठीण काळात आमच्या आणि इस्रायलमधील लोकांच्या पाठिशी उभे रहा. या दहशतवाद्यांचा खरा चेहरा आणि ते किती क्रूर असू शकतात हे लोकांनी पाहण्याची हीच वेळ आहे.” तर तिने ही पोस्ट शेअर केल्यावर या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. त्यात अनेकांनी तिच्या विचारांना पाठिंबा दिला, तर काहींनी इस्रायलमधील लोकांच्या बाजूने पोस्ट शेअर केल्याबद्दल तिला ट्रोल केलं. त्यानंतर आणखी एक पोस्ट शेअर करून तिने ट्रोल करणाऱ्यांचा निषेध करत दुःख व्यक्त केलं. तर त्या पोस्टमधून ती कुठल्याही प्रकारच्या हिंसेला पाठिंबा देत नसल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे.

Story img Loader