आपण मोठं होऊन कोणत्या क्षेत्रात जावं कोणत्या क्षेत्रात नाव कमवावं हे अनेकांचं लहान असतानाच ठरलेलं असतं. मात्र, अनेक व्यक्ती परिस्थितीमुळे स्वत:ची स्वप्नं पूर्ण करू शकत नाहीत. तसेत विविध कारणांमुळे ज्या क्षेत्रात रस आहे, तिकडे न वळता दुसऱ्या एखाद्या क्षेत्राकडे वळतात. असंच काहीसं मराठमोळी अभिनेत्री मधुरा वेलणकरबरोबरही घडलं आहे. तिनं स्वत: एका मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला आहे.
मराठी सिनेविश्वात चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमांतून मधुरा वेलणकर घराघरात पोहोचली आहे. ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या पहिल्याच चित्रपटानं तिनं प्रेक्षकांची मोठी प्रसिद्धी मिळवली. मधुराच्या आई रजनी वेलणकर आणि वडील प्रदीप वेलणकर यांनी मराठी मनोरंजन विश्वात मोठं नाव कमावलं आहे. घरातच मोठमोठे कलाकार असूनही मधुराला मनोरंजन विश्वाची गोडी लहानपणापासून नव्हती, असं तिनं सांगितलं आहे.
‘या’ क्षेत्रात कमवायचं होतं नाव
मुलाखतीत ती म्हणाली, “मी या क्षेत्रात ठरवून आलेले नाही. मी शाळेत गेले शिकले आणि आता मनोरंजन विश्वात जायचं आहे, असं माझं काही ठरलं नव्हतं. मला अजिबात या क्षेत्रात यायचं नव्हतं. कारण- मला क्रीडा क्षेत्रात रस होता. तसेच मला एअर होस्टेस व्हायचं होतं.”
अपघाताचा किस्सा
“अभिनय खरं तर मला कधी करायचाच नव्हता. मी अपघातानं या क्षेत्रात आले, असं म्हणायला हरकत नाही. कारण- मी एकदा दोरी मल्लखांब करताना खाली पडले होते. त्यात माझ्या हाताला लागलं. त्यावेळी मी घरी असताना या सुटीत करू म्हणून मी एक नाटक केलं. ते नाटक केल्यानंतर त्यातून एकेक पुढे काम मिळत गेलं आणि मला या क्षेत्राची आवड निर्माण झाली. जर लहानपणापासून माझं असं ठरलं असतं, तर त्या दृष्टीनं मी आकलन सुरू केलं असतं. जरी आई-बाबा या क्षेत्रात असले तरी माझ्यासाठी हा रस्ता नवीन होता”, असं मधुरा वेलणकर पुढे म्हणाली.
… मी आणखी छान काम करू शकले असते
“मी वेगळं वेगळं काम करण्यासाठी प्रयत्न केला. पहिल्या मालिकेत मी अगदी साध्या आणि सोज्वळ मुलीचं पात्र साकारलं होतं. मात्र, दुसऱ्या मालिकेत वाया गेलेल्या मुलीचं पात्र साकारलं होतं. त्या काळात जो प्रयत्न केला, तो पुरेसा नव्हता. कदाचित आवाज, बॉडी लँग्वेज, कॅमेरा या गोष्टी तेव्हा येत नव्हत्या, त्या मी अनुभवानं शिकले. त्यामुळे असं वाटतं की, या गोष्टी तेव्हा मी शिकले असते, तर मी आणखी छान काम करू शकले असते”, असंही मधुरा वेलणकर म्हणाली.