नवीन वर्षातही अनेक कलाकारांची लगीनघाई सुरू आहे. नुकतीच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम सोनू अर्थात झील मेहता लग्नबंधनात अडकली. ‘पाणी’ फेम मराठी अभिनेत्री रुचा वैद्यनेही दोन दिवसांपूर्वी साखरपुडा उरकला. आता आणखी एका टीव्ही अभिनेत्रीने गुड न्यूज दिली आहे. ‘इमली’ फेम अभिनेत्री मेघा चक्रवर्ती लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. मेघा अभिनेता साहिल फुल याच्याशी लग्न करणार आहे. साहिलने मेघाला गोव्यात प्रपोज केलं. तिथेच दोघांनी साखरपुडा केला.
साहिलने नवीन वर्षाच्या दिवशी १ जानेवारीला जेव्हा मेघाला प्रपोज केलं. मेघाने सोशल मीडियावर फोटो शेअर करून तिच्या भावना व्यक्त केल्या. फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “नवीन वर्ष, नवीन सुरुवात, आम्ही आशा आणि कृतज्ञतेने २०२५ चे स्वागत करत आहोत. आता आम्ही आणखी एक घोषणा करत आहोत की आम्ही लग्न करणार आहोत.”
मेघा चक्रवर्तीच्या लग्नाची तारीख ठरली
मेघा चक्रवर्ती आणि साहिल यांचे लग्न याच महिन्यात होणार आहे. दोघेही २१ जानेवारीला जम्मूमध्ये लग्न करणार आहेत. या सोहळ्याला फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार असल्याचं मेघाने सांगितलं. लग्नापूर्वी हळदी समारंभ आणि इतर विधी करणार असल्याचं ती म्हणाली.
लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत मेघा व साहिल
मेघाने ‘इमली’ आणि ‘मिश्री’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तिच्या ड्रिमी प्रपोजलबद्दल म्हणाली, “साहिलने मला १ जानेवारीला गोव्यात प्रपोज करून सरप्राइज दिलं. त्यानंतर आम्ही लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही आमच्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहोत. आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.”
हेही वाचा – Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ
मेघाने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तिचा सहकलाकार गौरव मुकेशने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दोघेही नेहमी आनंदात राहा, असं तो म्हणाला. मेघाच्या या पोस्टवर जिया शंकर, पारस अरोरा, सीरत कपूर, अनेरी यांनीही कमेंट्स करून दोघांना नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
साहिल फुलच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने ‘दिल ए काउच’, ‘एनआयएस पटियाला’, ‘कुंडली भाग्य’, ‘उतरन’, ‘हैवान’, ‘सुहागन,’ ‘पिया रंगरेझ’, ‘जगन्नाथ और पूर्वी की दोस्ती अनोखी’ आणि ‘काटेलाल अँड सन्स’ अशा अनेक शोमध्ये काम केलं आहे.