मोहेना कुमारी ही लोकप्रिय अभिनेत्री व डान्सर आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये कार्तिकच्या बहिणीची भूमिका साकारून तिला लोकप्रियता मिळाली. करिअरची सुरुवात रिअॅलिटी शोपासून करणाऱ्या मोहेनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मोहेनाने आनंदाची बातमी दिली आहे. ती दुसऱ्यांदा आई झाली आहे, तिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
मोहेनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही जणांच्या स्टोरी शेअर केल्या आहेत, ज्यात मुलगी झाल्याबद्दल तिचं अभिनंदन करण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं सांगितलं. व्हिडीओमध्ये ती ‘जब वी मेट’ चित्रपटातील ‘आओगे जब तुम ओ सजना’ या गाण्यावर डान्स करताना दिसली होती. गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये डान्स करत मोहेनाने तिचा बेबी बंप फ्लाँट केला होता. आता अभिनेत्रीने मुलीला जन्म दिला आहे.
मोहेनाच्या पतीचं नाव सुयश महाराज आहे. २०१९ मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. तिने २०२२ मध्ये तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला, त्याचं नाव अयांश आहे. मोहेना ही मध्य प्रदेशमधील रीवाची राजकुमारी असून तिचे सासरे उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज आहेत. तिचे पती सुयश हे फोटोग्राफर आहेत.
मोहेनाने तिच्या करिअरमध्ये ‘दिल दोस्ती डान्स’, ‘ये है आशिकी’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या शोमध्ये काम केलं आहे. लग्नानंतर ती संसारात रमली व अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती कुटुंबातील खास क्षणांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.