टेलिव्हिजन, चित्रपटसृष्टीनंतर आता ओटीटी प्लॅप्टफॉर्मवर आपल्या दमदार अभिनयानं अभिनेत्री मोना सिंह हिनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मोना सिंह शेवटची ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती ‘कफस’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीनं एक मोठा खुलासा केला आहे. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी मोना सिंहलादेखील कास्टिंग काऊचला सामोरं जावं लागलं होतं.
‘इंडिया टुडे’ या वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत मोना सिंहला विचारलं गेलं की, “तुलाही इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता का?” तेव्हा अभिनेत्री म्हणाली की, “होय. मी याचा सामना केला होता. ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेच्या आधीचा हा अनुभव होता. त्यावेळेस मी ऑडिशनसाठी पुण्याहून मुंबईला येत असे. या काळात मी अशा लोकांना भेटले, ज्यांच्यामुळे मला अवघडल्यासारखं, विचित्र आणि भयानक वाटलं.”
हेही वाचा – मुलाचं नाव मुस्लिम ठेवलं अन्…; अभिनेत्रीला डिलीट करावा लागला ‘तो’ व्लॉग, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
पुढे मोना म्हणाली की, “स्त्रीकडे एक असं वरदान आहे, ज्याच्यामुळे तिला कळतं की, कोण आपल्याबरोबर चांगलं आणि वाईट वागतंय. मग ती स्त्री कितीही निष्पाप, कमकुवत असो किंवा लहान असो; तिच्या भावना कधीच चुकीच्या नसतात. त्यामुळे त्यावेळेस मी फक्त अवघड स्थितीत आहे, आता काय करू? यातून कशी बाहेर पडू? याचाच विचार करत होते.”
हेही वाचा – Bigg Boss OTT 2: “नरकातून बाहेर आलो”, ‘या’ सदस्यानं बिग ओटीटीच्या घरातला सांगितला भयानक अनुभव
“कास्टिंग काऊच एक अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आहे. आयुष्यात अशा गोष्टी होत राहतात. फक्त त्या गोष्टींमुळे खचून न जाता, जे तुमचं ध्येय आहे, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा. मी कास्टिंग काऊच गोष्टींमुळे कधीच खचून गेले नाही. मी अजूनही माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते आहे. तसेच आता कास्टिंग काऊच व्यक्तिगत आवडी-निवडीचा प्रश्न झाला आहे,” असं स्पष्टच मोना सिंह म्हणाली.