अभिनयक्षेत्रात कास्टिंग काउचच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. अनेक नवख्या कलाकारांना याचा सामना करावा लागतो. खासकरून अभिनेत्रींना काम मिळवण्यासाठी या गोष्टींना सामोरं जावं लागतं. ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री मृणाल नवल हिलादेखील कास्टिंग काउचचा अनुभव आला, याबाबत तिने खुलासा केला आहे.
मृणाल म्हणाली, “एक वर्षापूर्वी हे घडलं जेव्हा मी माझा पहिला शो करत होते. मी टीव्ही जाहिरातींसाठी अनेक ऑडिशन्स देत असे. त्याने (कास्टिंग एजंट) मला सांगितलं की दोन मुलींची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी एक कार्तिक आर्यनबरोबर जाहिरात करेल. त्यानंतर दुसर्या दिवशी मला मेसेज आला की भूमिका मिळवण्यासाठी मला तडजोड करावी लागेल. तडजोड म्हणजे काय हे मला माहीत होतं, पण तरीही त्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे मला जाणून घ्यायचं होतं.”
मृणालने त्याला विचारलं, “तुम्ही कोणत्या तडजोडीबद्दल बोलत आहात?” त्याने उत्तर दिलं, “फक्त एक कॅज्युअल हुकअप, फक्त एक रात्र आणि आपण तिथेच कॉन्ट्रॅक्टवर सही करू शकतो.” हे ऐकताच २२ मृणालचा संताप अनावर झाला आणि तिने त्याला सुनावलं, मग त्याने तो मेसेज डिलीट केला. “मी त्याला म्हटलं की मला अशा गोष्टींची गरज नाही, त्यानंतर माझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि मी ती जाऊ देऊ नये असं तो म्हणाला. जेव्हा त्याने माझ्यावर दबाव आणायला सुरुवात केली, तेव्हाच मला प्रचंड राग आला आणि मी त्याला आणखी सुनावलं,” असं मृणाल म्हणाली. दरम्यान, कलाकारांना चित्रपट कसे मिळतात तुला माहीत नाही, सर्वांना असं करावं लागतं, तू आता तयार झालीस तर तुला चित्रपट मिळवून देईन, असा दावाही त्याने केला. यानंतर आपण त्याला ब्लॉक केल्याचा खुलासा मृणालने केला.
“बर्याच ऑडिशन्समध्ये मुली तोकड्या कपड्यांमध्ये बसलेल्या असतात आणि त्यांच्याकडे खूप विचित्रपणे लोक पाहतात. पण मुलींनी याबाबत काळजी घ्यायला हवी, या गोष्टींचा विरोध करायला हवा. ते ऑडिशनमध्ये मुलींना तोकडे कपडे घालायला सांगतात. पण ऑडिशनमध्ये अभिनय आणि लूक पाहायचा असतो, त्यासाठी तोकडे कपडे घालणं गरजेचं नसतं. इंडस्ट्रीत असे बरेच लोक आहेत, त्यामुळे आपण सावधगिरी बाळगली पाहिजे,” असं मृणाल म्हणाली.